India Vs Pakistan : पाकिस्तान आंतरराष्ट्रीय मदतीच्या पैशाचा वापर दहशतवादासाठी करतोय; भारताचा आरोप, IMF मतदानापासून दूर
India Pakistan Tension : वारंवार बेलआउटमुळे पाकिस्तान मोठ्या कर्जाच्या ओझ्याने दबला आहे, यावर भारताने भर दिला. अशाप्रकारे, तो एक मोठा कर्जदार आहे.

नवी दिल्ली : सीमेवर सुरू असलेल्या तणावादरम्यान भारत पाकिस्तानला सर्व बाजूंनी घेरत असल्याचं चित्र आहे. भारताने आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने पाकिस्तानसाठी प्रस्तावित केलेल्या 1.3 अब्ज डॉलर्सच्या बेलआउट पॅकेजवर चिंता व्यक्त केली. पाकिस्तानचा इतिहास खूपच खराब आहे आणि ते या निधीचा वापर दहशतवादासाठी करत असण्याची शक्यता आहे असा आरोप भारताने केला. या संदर्भात घेण्यात आलेल्या आयएमएफच्या मतदानासाठीही भारत अनुपस्थित राहिला.
भारत सरकारने एक निवेदन जारी करून म्हटलं आहे की, "आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने आज विस्तारित निधी सुविधा (EFF) कर्ज कार्यक्रमाचा आढावा घेतला आणि पाकिस्तानसाठी नवीन लवचिकता आणि स्थिरता सुविधा (RSF) कर्ज कार्यक्रम (1.3 अब्ज डॉलर) वर देखील विचार केला. एक सक्रिय आणि जबाबदार सदस्य देश म्हणून, भारताने पाकिस्तानच्या बाबतीत IMF कार्यक्रमांच्या प्रभावीतेबद्दल चिंता व्यक्त केली. कारण त्याचा खराब ट्रॅक रेकॉर्ड आणि स्टेट स्पॉन्सर्ड टेरोरिजमसाठी कर्ज वित्तपुरवठा निधीचा गैरवापर होण्याची शक्यता आहे."
भारताने निषेध म्हणून आणखी काय म्हटले?
9 मे रोजी वॉशिंग्टन येथे झालेल्या आयएमएफ बोर्डाच्या बैठकीत, भारताने पाकिस्तानकडून आयएमएफ मदतीशी संबंधित अटी पूर्ण करण्यात वारंवार अपयश आल्याबद्दल चिंता व्यक्त केली. पाकिस्तानला आयएमएफ कर्ज राजकीय कारणांमुळे प्रभावित झाले आहे. ज्यामुळे निधीच्या प्रभावीपणा आणि अंतिम वापराबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत, या व्यापक धारणाकडेही भारताने लक्ष वेधले.
पाकिस्तान दहशतवाद्यांना निधी देतो
भारताने सातत्याने असा युक्तिवाद केला आहे की पाकिस्तानला मिळणारी आर्थिक मदत अप्रत्यक्षपणे लष्करी गुप्तचर कारवाया आणि लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनांना पाठिंबा देते. या दहशतवादी गटांनी भारतावर हल्ला करण्याचा कट रचला आहे.
पाकिस्तानला पैसे कोण देते?
IMF (आंतरराष्ट्रीय नाणेनिधी)
पाकिस्तानला आतापर्यंत IMF कडून अनेक बेलआउट पॅकेजेस मिळाले आहेत. जुलै 2023 मध्येच, आयएमएफने पाकिस्तानला 3 अब्ज डॉलर्सची स्टँडबाय व्यवस्था मंजूर केली होती. आताही जवळपास सात अब्ज डॉलर्सचे बेल आऊट पॅकेज मिळणार आहे.
जागतिक बँक
जागतिक बँक देखील पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात निधी देते. शिक्षण, आरोग्य, ऊर्जा आणि पायाभूत सुविधा यासारख्या क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्यासाठी पाकिस्तानला जागतिक बँकेकडून नियमित निधी मिळतो.
आशियाई विकास बँक (ADB)
आशियाई विकास बँक म्हणजे ADB पाकिस्तानला पायाभूत सुविधा विकास, वीज प्रकल्प आणि वाहतूक व्यवस्था यासाठी कर्ज देखील देते. याशिवाय चीन, सौदी अरेबिया, यूएई सारख्या देशांनीही पाकिस्तानला द्विपक्षीय कर्ज आणि मदत दिली आहे.























