'इंडिया' हे नाव गुलामगिरीचं प्रतीक, ते घटनेतून वगळलं पाहिजे; भाजप खासदाराची राज्यसभेत मागणी
इंडिया हे नाव गुलामगिरीची बेडी, संविधानातून 'इंडिया' हा शब्द हटवा, भाजपचे खासदार नरेश बन्सल यांची मागणी
New Delhi: आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) भाजपला (BJP) सत्तेपासून दूर करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकजूट केली आहे. सर्व भाजप विरोधी पक्ष एकत्र आले असून 26 विरोधी पक्षांच्या युतीला I.N.D.I.A. (इंडियन नॅशनल डिवेलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायंस) असं नाव देण्यात आलं आहे. यावरुनच भाजपनं विरोधकांच्या एकजुटीवर निशाणा साधला आहे. या सर्व राजकीय उलथापालथी दरम्यान, आता मात्र भाजपच्या एका खासदारानं केलेल्या मागणीमुळं राजकीय नाट्याचा नवा अंक रंगण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाच्या (BJP) एका राज्यसभा खासदारानं गुरुवारी देशाच्या संविधानातून 'इंडिया' हा शब्द हटवण्याची मागणी केली आहे.
भाजपचे राज्यसभेतील खासदार नरेश बन्सल (BJP MP Naresh Bansal) यांनी सभागृहात बोलताना ही मागणी केली. तसेच, इंडिया हे नाव वसाहतींचे प्रतीक आणि गुलामगिरीची बेडी असल्याचंही खासदार बन्सल यांनी राज्यसभेत बोलताना म्हटलं आहे.
आज संसद के मानसून सत्र मे विषेश उल्लेख मे मांग उठाई की देश का नाम इंडिया दैट इज भारत हटा कर केवल “भारत” होना चाहिए।आजादी के अमृत काल मे अंग्रेजी गुलामी के प्रतिक को हटा कर इस पुण्य पावन धरा का नाम संविधान के अनुच्छेद 1 में संशोधन कर पुनः “भारत” रखा जाए । 1/2 #ParliamentSession pic.twitter.com/rFoivEwQA2
— Naresh Bansal (@bjpnareshbansal) July 27, 2023
आपल्या मागणी स्पष्ट करताना खासदार बन्सल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करताना केलेल्या भाषणाचा संदर्भ दिला, ज्यामध्ये त्यांनी देशाला गुलामगिरीच्या प्रतिकांमधून मुक्त करण्याचं आवाहन केलं होतं.
बन्सल म्हणाले की, गेल्या नऊ वर्षांत पंतप्रधान मोदींनी अनेक प्रसंगी वसाहतवादी वारसा आणि वसाहतवादाशी संबंधित प्रतिकं हटवून त्यांच्या जागी पारंपारिक भारतीय प्रतिके, मूल्य आणि विचार आणण्याचं समर्थन केलं आहे.
भाजप खासदार बन्सल म्हणाले की, ब्रिटिशांनी भारताचं नाव बदलून इंडिया केलं. स्वातंत्र्यसैनिकांचे अथक परिश्रम आणि बलिदानामुळे 1947 मध्ये देश स्वतंत्र झाला आणि 1950 मध्ये संविधानात 'इंडिया म्हणजेच भारत' असं लिहिलं गेलं. तसेच, पुढे बोलताना ते म्हणाले, शतकानुशतके देशाचं नाव भारत आहे आणि त्या नावानंच संबोधलं गेलं पाहिजे. भारताचे इंग्रजी नाव, इंडिया हा शब्द ब्रिटिशांच्या गुलामगिरीचे प्रतीक असल्याचंही बन्सल म्हणाले.
बन्सल म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृतकाळात गुलामगिरीचं प्रतीक हटवलं गेलं पाहिजे. संविधानातील कलम 1 मध्ये सुधारणा करून 'इंडिया दॅट इज' काढून या पवित्र भूमीचं नाव भारत ठेवावं, अशी मागणी त्यांनी केली. भारत माता (भारत) नावाच्या रूपानं या गुलामगिरीच्या जंजाळातून मुक्त झाली पाहिजे, असंही ते म्हणाले.
भाजप खासदारानं अशावेळी ही मागणी केली आहे, जेव्हा विरोधी पक्षांनी एकजूट करून त्यांच्या आघाडीचं नाव 'इंडिया' ठेवलं आहे.
दरम्यान, अलीकडेच पंतप्रधान मोदींनी 'इंडिया'ची तुलना इंडियन मुजाहिदीन आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया यांसारख्या दहशतवादी संघटनांशी केली असून, केवळ नाव बदलून व्यक्तिरेखा बदलत नाही, असंही ते म्हणाले आहेत.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी विरोधी आघाडीवरही निशाणा साधला. राज्यसभेत त्यांच्या एका वक्तव्या दरम्यान गदारोळ माजवल्याबद्दल आणि सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणल्याबद्दल ते म्हणाले की, विरोधी सदस्य 'इंडिया' (विरोधी आघाडीचे नाव) असल्याचा दावा करतात, परंतु ते ऐकण्यास तयार असतील तर भारताचे राष्ट्रीय हित जर नसेल तर ते कोणत्या प्रकारचे इंडिया आहेत?
दरम्यान, संसदेच्या चालू अधिवेशनात सत्ताधारी पक्षाचे सदस्य सभागृहात मोदी-मोदीच्या घोषणा देतात, तर विरोधी पक्षाचे सदस्य 'इंडिया'-'इंडिया'च्या घोषणा देतात, असे अनेकदा दिसून आले आहे.