Vaccination : भारतात 92 टक्के जणांना पहिला, तर 70 टक्के नागरिकांना दुसरा डोस, केंद्रीय मंत्र्यांची माहिती
भारताची लोकसंख्या पाहता संपूरण लसीकरण एक मोठं आव्हान आहे. पण केंद्र सरकारने वेगवान लसीकरण करत 92 टक्के नागरिकांना पहिला, तर 70 टक्के नागरिकांना दुसरा डोस दिल्याची माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली आहे.
Covid Vaccination : कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी लसीकरण हे एक मोठं शस्त्र असून भारतातही लसीकरणाने चांगला वेग धरला आहे. दरम्यान भारतात आतापर्यंत 92 टक्के नागरिकांनी कोरोना लशीचा पहिला तर 70 टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतल्याचं समोर आलं आहे. केंद्रीय क्रिडामंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबत ट्वीट देखील केलं आहे. याशिवाय 15 ते 18 वयोगटातील लसीकरण सुरु झाल्यानंतर आतापर्यंत तीन कोटीहून अधिकांनी ही लस घेतल्याचंही केंद्रानं सांगितलं आहे.
मुंबईतील रुग्णंसख्या वाढतीच
मुंबईत मागील 24 तासांत 13 हजार 702 नवे कोरोनाबाधित सापडले असून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारच्या तुलनेत ही संख्या जवळपास तीन हजाराने कमी असली तरी अजूनही रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने कोरोनाचा धोका मुंबईकरांना कायम आहे. त्यामुळे योग्य काळजी घेऊन नियम पाळणं महत्त्वाचं झालं आहे. मुंबईत बुधवारी 20 हजार 849 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट एका टक्क्याने वाढून 88 टक्क्यांवर पोहचला आहे. तसेच मागील 24 तासांत सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 426 झाली आहे.
देशात 2 लाख 47 हजार 417 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
मागील 24 तासात देशात 2 लाख 47 हजार 417 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच कोरोनाचा नवीन व्हेरियंट असलेल्या ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. कोरोनाचा पॉझिटीव्हीटी रेट देखील दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या कोरोनाचा पॉझिटीव्हीटी रेट हा 13.11 आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे. कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच असून, ओमायक्रनचा धोका देखील वाढत असल्याचे चित्र आहे. आत्तापर्यंत ओमायक्रॉनचे 5 हजार 488 रुग्ण आढळले आहेत. रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे. सध्या देशात कोरोनाचे सक्रिय रुग्ण हे 11 लाख 17 हजार 531 आहेत. तर गेल्या 24 तासात 84 हजार 825 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. आत्तापर्यंत 3 कोटी 47 लाख 15 हजार 361 लोक कोरोनातून बरे झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
- Maharashtra Corona Update : राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ; गेल्या 24 तासात 46,723 रुग्णांची नोंद तर 32 जणांचा मृत्यू
- मुंबईतील रोजच्या कोरोना रुग्ण संख्या चढ-उताराचा निष्कर्ष नेमका काय काढायचा?
- Mumbai Corona Update : दिलासा! मुंबईत गुरुवारी नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांचे प्रमाण जास्त
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha