Corona Vaccine Drive Live Updates | देशव्यापी कोरोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ
Corona Vaccination Drive : भारतात आजपासून जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. देशात आज कोविड लसीकरणाचा शुभारंभ होत आहे.

Background
मुंबई : भारतात आजपासून जगातील सर्वात मोठ्या कोविड लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. पहिल्या दिवशी देशभरातील तीन लाखांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड-19 लस दिली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी साडेदहा वाजता पहिल्या टप्प्यातील लसीकरण अभियानाची सुरुवात करतील.
पंतप्रधान कार्यालयाने म्हटलं की, हे जगातील सर्वात मोठ लसीकरण अभियान आहे, ज्यात संपूर्ण देशाचा समावेश आहे. लोकसहभागाच्या माध्यमातून या अभियानाच्या सुरुवातीची तयारी झाली आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लसीकरणासाठी एकूण 3006 केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे.
1.65 कोटी डोस
केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन म्हणाले की, सीरम इन्स्टिट्यूटने विकसित केलेल्या 'कोविशील्ड' आणि भारत बायोटेकच्या 'कोवॅक्सिन' या दोन्ही लसींना सरकारने आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली. दोन्ही लसींचे 1.65 कोटी डोस सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना डेटाबेसमध्ये असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार वितरित केले आहेत. कोविड-19 महामारी, लसीकरण आणि CoWin अॅप संदर्भात प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी कॉल सेंटर्सचीही स्थापना करण्यात आली आहे.
सर्वात आधी लस कोणाला?
सरकारच्या माहितीनुसार, सर्वात आधी एक कोटी आरोग्य कर्मचारी आणि फ्रण्ट लाईनवर काम करणाऱ्या सुमारे दोन कोटी कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. यानंतर 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना लस दिली जाईल. त्यानंतर 50 वर्षांपेक्षा कमी वय असलेले परंतु गंभीर आजार असलेल्या लोकांचं लसीकरण होईल. सर्व आरोग्य कर्मचारी आणि फ्रण्ट लाईनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्च सरकार करणार आहे.























