India Coronavirus : वाढता वाढता वाढे, गेल्या 24 तासांत 18 हजारांहून अधिक रुग्ण, पॉझिटिव्हिटी रेट 4.32 टक्क्यांवर
India Coronavirus : देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ. गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 18 हजार 930 नव्या रुग्णांची नोंद.
India Coronavirus : देशात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव सातत्यानं वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 18 हजार 930 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल देशात 35 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील नव्या कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 19 हजार 457 वर पोहोचली आहे. पॉझिटिव्हिटी रेट वाढून 4.32 वर पोहोचला आहे.
देशातील कोरोनाचा आतापर्यंतचा एकूण आकडा 4 कोटी 35 लाख 66 हजार 739 वर पोहोचला आहे. केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, बंगाल आणि कर्नाटक या 5 राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासांत केरळमध्ये 4113, महाराष्ट्रात 3142, तामिळनाडूमध्ये 2743, बंगालमध्ये 2352 आणि कर्नाटकमध्ये 1127 रुग्णांची नोंद झाली आहे.
लसीकरणाचा आकडा 198 कोटींच्या पुढे
देशात गेल्या 24 तासांत 14 हजार 650 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 4 कोटी 29 लाख 21 हजार 977 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच, गेल्या 24 तासांत देशात 1144489 लसीचे डोस देण्यात आले आहेत. त्यानंतर आतापर्यंत 198 कोटी 33 लाख 18 हजार 772 डोस घेण्यात आले आहेत.
राज्यात बुधवारी 3142 नव्या रुग्णांची नोंद
राज्यात काल (बुधवारी) 3142 कोरोनाच्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर काल दिवसभरात एकूण 3974 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. काल नोंद झालेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मुंबईतील आहे. मुंबईत सध्या 5600 सक्रिय रुग्ण आहेत. राज्यात काल सात कोरोनाबाधित (Corona Death) रुग्णांनी आपला जीव गमवाला. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर हा 1.85 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 78, 25,114 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.90 टक्के इतकं झालं आहे.
मुंबईत बुधवारी 695 रुग्णांची नोंद, 1504 कोरोनामुक्त
मुंबईमध्ये मागील काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांचा स्फोट मुंबईसह महाराष्ट्रात होत आहे. काल मुंबईत 695 रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या आकडेवारीमुळे प्रशासनासह (Mumbai BMC) नागरिकांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत बुधवारी 1504 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 10 लाख 91 हजार 607 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19 हजार 620 झाली आहे. सध्या मुंबईत 5,600 रुग्ण आहेत. दरम्यान मुंबईत आढळलेल्या नव्या 695 रुग्णांमध्ये 655 रुग्णांना अधिक लक्षणं नसल्याने काहीसा दिलासा मुंबईकरांना मिळाला आहे. रुग्ण दुपटीचा दर आणि सक्रिय रुग्णसंख्यादेखील वेगाने वाढत आहे. रुग्ण दुपटीचा दर 836 दिवसांवर गेला आहे.