India China:  एकीकडे सीमावादावर चर्चा सुरू असताना दुसरीकडे  प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ चीनची आगळीक सुरू असल्याचे समोर आले आहे. लडाख पूर्व भागातील  पँगोंग सरोवराजवळ चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (PLA) पुलाचे बांधकाम सुरू केले आहे. ओपन सोर्स सॅटेलाइट इमेजमुळे या पुलाच्या बांधकामाची बाब समोर आली आहे. 


ओपन सोर्स इंटेलिजेन्स 'इंटेल लॅब'नुसार, चीन पँगोंग तलावाजवळ एक पूल तयार करत असल्याचा दावा केला आहे. चीनच्या सैन्याला तलावाच्या उत्तर आणि दक्षिण भागात सहजपणे ये-जा करता यावी यासाठी हा पूल बांधला जात असल्याचे म्हटले जात आहे. 


जवळपास 140 किमी लांबी असलेल्या पँगोंग झीलचा दोन तृतीयांश भाग, म्हणजे जवळपास 100 किमी भाग हा चीनच्या ताब्यात आहे. चिनी सैन्याला एका दिशेहून दुसरीकडे जाण्यासाठी बोटीचा आधार घ्यावा लागतो. आता सैन्याच्या सोयीसाठी चिनी लष्कराकडून पूल बांधला जात आहे. त्याशिवाय, रस्त्याचेही काम सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे. 






 


दरम्यान, चीनच्या या आगळकीवर भारताने अद्याप प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. भारताकडूनही चीनलगतच्या सीमा भागात रस्ते बांधणी सुरू आहे. मागील आठवड्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रत्यक्ष ताबा रेषेजवळील भागातील काही पुलांचे उद्घाटन केले होते. 
 
दोन वर्षांपूर्वी भारत-चीन सैन्यात संघर्ष


संपूर्ण जगात कोरोनाचा हाहा:कार उडाला असताना चीनने लडाखमध्ये घुसखोरी केली होती. पँगोंग तलावाजवळ असणाऱ्या प्रत्यक्ष ताबा रेषेवर वाद झाला होता. भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या सीमावादामुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील भागात बांधकाम करण्यास आक्षेप घेतला जातो. 


दोन वर्षांपूर्वी भारतीय सैन्याकडून आपल्या हद्दीत रस्ते बांधणीचे काम सुरू केले होते. त्यावर चीनने आक्षेप घेतला होता. त्यानंतर तणाव निर्माण झाला होता. त्याच्या काही दिवसांनी चीनच्या सैन्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. त्यानंतर भारतीय सैन्याने चीनच्या आगळकीला विरोध केला. जून 2020 मध्ये गलवान खोऱ्यात भारत-चीनच्या सैन्यात हिंसक संघर्ष झाला. या संघर्षात भारताच्या 20 जवानांनी प्राणांची आहुती दिली. तर, चीनचेही काही सैन्य ठार झाले होते.  


सैन्याची कुमक वाढवली


गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये लष्करी पातळीवर चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या. त्यानंतर दोन्ही देशांनी लडाख पूर्वमधील प्रत्यक्ष ताबा रेषेवरील काही भागांमधून सैन्य माघारी घेण्याचा निर्णय घेतला होता. चीनने सैन्य माघारी घेतल्यानंतर पुन्हा सैन्याची कुमक वाढवली. त्यानंतर भारतानेदेखील आपल्या जवानांची संख्या वाढवली.