इकडचं-तिकडचं बोलू नका, हरदीपसिंह निज्जरबाबत केलेल्या आरोपांचे पुरावे द्या, भारतानं कॅनडाला थेटच सुनावलं
Khalistan Supporter Hardeep Singh Nijjar Killing: खलिस्तान समर्थक हरदीपसिंह निज्जरच्या हत्येसाठी कॅनडानं भारताला जबाबदार धरलं होतं, पण आता तो फसल्याचं दिसत आहे. भारतानं पुरावं मागितलं आहेत.
India- Canada Relations: खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जर (Hardeep Singh Nijjar) यांच्या हत्येप्रकरणी भारतानं कॅनडाला थेट फैलावर घेतलं आहे. इकडचं-तिकडचं बोलू नका, हरदीप सिंह निज्जरबाबत केलेल्या आरोपांचे पुरावे द्या, असं म्हणत भारतानं कॅनडाला थेट सुनावलं आहे. दरम्यान, बुधवारी (20 सप्टेंबर) राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी गृहमंत्री अमित शहा यांची नव्या संसद भवनात भेट घेतली होती. याशिवाय परराष्ट्र मंत्रालय आणि राष्ट्रीय सुरक्षा एजन्सी यांच्यातही बैठक झाली. यानंतर भारतानं कॅनडाकडून पुरावे मागवले आहेत.
हिंदुस्तान टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, भारतानं कॅनडाला भारतीय गुप्तचर संस्थांवर केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी केली आहे. दुसरीकडे, पुराव्याच्या आधारे भारत कॅनडामधील तपासात सहभागी होण्यास तयार आहे, असं देखील सांगितलं आहे. तसेच, ट्रुडो (Justin Trudeau) यांनी भारताचे मित्र राष्ट्र अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांना या प्रकरणी ज्या प्रकारे आवाहन केलं, त्यांनाही भारतानं हे सांगण्याचाही प्रयत्न केला की, भारतीय गुप्तचर संस्थांचा या हत्येशी काहीही संबंध नाही आणि कॅनडाकडून करण्यात येणारे सर्व आरोप निराधार तसेच राजकीय हेतूनं प्रेरित आहेत.
भारताकडून आखली जातेय योजना
कॅनडात ट्रुडो यांचे सरकार अल्पमतात असून त्यांना न्यू डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ खलिस्तानचे जगमीत सिंह यांचा पाठिंबा आहे. कॅनडामधील भारतीय प्रवासी शीख आणि हिंदू यांच्यात कोणतंही ध्रुवीकरण होणार नाही आणि कॅनडात राहणारे भारतीय लोक सुरक्षित राहतील याची खात्री करण्यासाठी भारत योजना आखत आहे. दरम्यान, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी आपल्या संसदेत भाषण करताना हरदीपसिंह निज्जर यांच्या हत्येचा आरोप भारतावर केला होता. भारतानं यापूर्वीच हा आरोप फेटाळून लावला आहे.
एस. जयशंकर संयुक्त राष्ट्रात भूमिका मांडणार
हिंदुस्तान टाईम्सनं एका अधिकाऱ्याच्या हवाल्यानं आपल्या वृत्तात म्हटलं आहे की, परराष्ट्र मंत्री संयुक्त राष्ट्राच्या महासभेत सहभागी होण्यासाठी 23 सप्टेंबर रोजी न्यूयॉर्क, अमेरिकेला रवाना होणार आहेत. जिथे ते भारताची भूमिका स्पष्ट करतील. 26 सप्टेंबर रोजी UNGA मध्ये संबोधित केल्यानंतर ते वॉशिंग्टन डीसीलाही भेट देण्याची शक्यता आहे.
भारत आणि कॅनडातील वादाचं नेमकं कारण काय?
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो म्हणाले की, भारत सरकारनं हे प्रकरण गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. आम्ही चिथावणी देण्याचा किंवा तणाव वाढवण्याचा प्रयत्न करत नाही. आम्ही फक्त वस्तुस्थिती मांडत आहोत." तसेच, पुढे बोलताना म्हणाले की, "आम्ही सर्व काही स्पष्ट करण्यासाठी आणि योग्य प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकारसोबत काम करू इच्छितो." दरम्यान, कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील सरे येथील गुरुद्वाराबाहेर 18 जून रोजी दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जरची गोळ्या झाडून हत्या केली होती. याच प्रकरणी कॅनडाकडून भारतावर गंभीर आरोप करण्यात आले असून भारतानं मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.