मुंबई : मोबाईल निर्माण करणाऱ्या कंपन्या  Xiaomi आणि Oppo वर कर कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी 1000 कोटी रुपयांचा दंड भरावा लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आठ दिवसांपूर्वी आयकर विभागाने या कंपन्यांच्या कार्यालयावर धाडी टाकून कागदपत्रांची तपासणी केली होती. या दोन कंपन्यांनी त्यांच्या परदेशात असलेल्या कंपन्यांना रॉयल्टीच्या स्वरुपात साडेपाच हजार कोटी रुपये दिल्याची नोंद आहे. पण या कंपन्यांनी केलेली ही नोंद चुकीची असल्याचा संशय आयकर विभागाला आहे. 


Xiaomi आणि Oppo या दोन्ही कंपन्यांनी आयकर अधिनियमन, 1961 चे उल्लंघन केलं आहे. त्यामुळे या दोन कंपन्यांना तब्बल 1000 कोटी रुपयांचा कर भरावा लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आयकर विभागाने केलेली कारवाई ही कर्नाटक, तामिळनाडू, आसाम, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, बिहार, राजस्थान, दिल्ली आणि  एनसीआर राज्यांच्या विविध भागात करण्यात आली होती.  


या अगोदर ऑगस्ट महिन्यात चिनी कंपनी जेडटीएफ कंपनीवर आयकर विभागाने छापे टाकले होते. ही छापेमारी गुरूग्राममध्ये झाली होते. त्यावेळी आयकर विभागाने भारतातील प्रमुखांची चौकशी केली होती. 


भारत ही स्मार्टफोनची मोठी बाजारपेठ असून या क्षेत्रातील उलाढाल जवळपास 2.5 लाख कोटीच्या आसपास आहे. यामध्ये 70 टक्के हिस्सा हा चिनी कंपन्याचा आहे. केंद्र सरकारने संसदेत सांगितले की, देशात सध्या 92 चिनी कंपन्या रजिस्टर्ड आहे. त्यापैकी 80 कंपन्या बाजारात सक्रिय आहेत. मोबाईल बाजारात 10 ते 15 टक्क्यांपेक्षा जास्त भागीदारी असणारे ओप्पो आणि विवो मजबूत ऑफलाईन खेळाडू मानले जातात. एका रिपोर्टच्या माहितीनुसार, चिनी कंपन्यांनी भारतात वितरणासाठी एक व्यवस्था केली आहे. ज्यामुळे भारतीय ग्राहक जास्तीत जास्त आकर्षित होतात.


महत्त्वाच्या बातम्या :