WHO on Night Curfew : ओमयाक्रॉन व्हेरियंटच्या (Omicron variant ) वाढत्या प्रभावामुळे भारतात निर्बंध लावले जात आहेत. अनेक राज्यामध्ये नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. तसेच शाळा-महाविद्यालय बंद करण्यासह इतर निर्बंधही लावलण्यात येत आहेत. पण नाईट कर्फ्यू लावून अथवा शाळा बंद करण्यामुळे कोरोनाचा प्रसार कमी होणार आहे का? हा उपाय कोरोनाविरोधात प्रभावी आहे का?  यावर जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामिनाथन (WHO Chief Scientist Soumya Swaminathan ) यांनी आपलं मत सांगितलं आहे.  'भारतासारख्या देशात लावण्यात येणाऱ्या नाईट कर्फ्यूचा कोणताही वैज्ञानिक आधार नाही. सर्वात आधी शाळा सुरू व्हाव्यात, असे मत डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी शुक्रवारी CNBC-TV18 शी बोलताना व्यक्त केलं आहे.'  


डॉ. सौम्या स्वामिनाथन म्हणाल्या की, 'भारतासारख्या देशात लावण्यात येत असलेल्या नाईट कर्फ्यूला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. हा कितपत प्रभावी होतो, याचे कोणतेही पुरावे नाहीत. मास्क आणि लसीकरण कोरोना महामारीला (COVID-19 ) रोखण्यात मोठी भूमिका बजावत आहेत.' जर 90 टक्के लोकांनी पूर्णवेळ मास्क घातला, तर कोरोनाचा संसर्गाला मोठ्या प्रमाणात आळा बसेल. यावर आपल्याला काम करायला हवं, असा दावाही डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी केला. फक्त कोरोनाच नव्हे तर इतर आजारही आपल्या आयुष्याला प्रभावित करु शकतात, हे आपण विसरता कामा नये, असे यावेली डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितलं. 


लॉकडाऊन आणि निर्बंधाबात बोलताना डॉ. सौम्या स्वामिनाथन म्हणाल्या की, 'राजकीय नेत्यांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी योग्य त्या वैज्ञानिक पद्धतीचा विचार करावा. तसेच निर्बंध लावताना लोकांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी.  त्यासोबतच आर्थिक चक्र सुरु राहिल याचाही विचार करावा. कारण लोकांचं आधीच मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे पुन्हा तशा परिस्थितीला सामोरं जाण्याची लोकांची परिस्थिती नाही.' बिकट परिस्थितीमध्ये शाळा बंद करण्याचा विचार करावा, अन् निर्बंधामध्ये शिथिलता द्यायची असेल तर सर्वात आधी शाळा सुरु करण्याचा विचार व्हायला हवा. कारण, दिर्घकाळ शाळा बंद राहिल्यास मुलांवर वाईट परिणाम होऊ शकतात, असे डॉ. सौम्या स्वामिनाथन म्हणाल्या. कोरोना प्रतिबंधक लसीच्या बूस्टर डोसमुळे आपली रोगप्रितकारक शक्ती वाढण्यास मदत होते, असेही डॉ. सौम्या स्वामिनाथन म्हणाल्या. 


मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live 



आणखी वाचा :