छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे चार जवान शहीद
बिजापूरच्या बासागुडा तररेम मार्गावर आवपल्ली आणि मुरदोंडादरम्यान ही घटना घडली आहे. हल्ल्यात शहीद झालेले जवान सीआरपीएफ-168 बटालियनचे होते.

छत्तीसगड : बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचे चार जवान शहीद झाले आहेत. चकमकीत दोन जवानही जखमी झाले. जखमी जवानांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
बिजापूरच्या बासागुडा तररेम मार्गावर आवपल्ली आणि मुरदोंडादरम्यान ही घटना घडली आहे. हल्ल्यात शहीद झालेले जवान सीआरपीएफ-168 बटालियनचे होते. सीआरपीएफचे जवान गस्तीसाठी बाहेर पडलेले असताना मुरदोंडा गावाजवळ हा हल्ला झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
सहा जवान गाडीने जात असताना नक्षलवाद्यांनी भूसुंरुग स्फोट केला. घटनेची माहिती मिळताचा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमी जवानांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल केलं.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमन सिंह सध्या बस्तरच्या दौऱ्यावर आहेत. रमन सिंह यांनी सुकमा जिल्ह्यातील दोरनापाल, दंतेवाडा आणि बस्तर जिल्ह्यातील बागमोहलई गावात सभा घेतली. नोव्हेंबरमध्ये छत्तीसगडमध्ये विधानसभेची निवडणूक आहे. राज्यात दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात नक्षलग्रस्त भागात मतदात होणार आहे. त्यामुळे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणेवर झालेला हा मोठा नक्षलवादी हल्ला मानला जात आहे.
याआधी देखील मे महिन्यात छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यातील जंगलातील भागात नक्षलवाद्यांनी भू-सुरुंगाचा स्फोट घडवून आणला होता. त्यात सशस्त्र दलाचे पाच जवान तर जिल्हा पोलिस दलाचे दोघे असे एकुण सात जण शहिद झाले होते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
