आंध्रचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या बहिणीला पोलिसांकडून अटक, निषेधाचा व्हिडीओ व्हायरल
YS Sharmila Arrested In Hyderabad: वायएस शर्मिला या टीआरएस कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आणि त्यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याच्या विरोधात मोर्चा काढत होत्या.
YS Sharmila Arrested In Hyderabad: वायएसआर तेलंगणा (Telangana) पक्षाच्या प्रमुख वायएस शर्मिला (YS Sharmila) यांना काल हैदराबाद पोलिसांनी (Hyderabad Police) अटक करून न्यायालयात हजर केलं. वायएस शर्मिला यांनी मंगळवारी (29 नोव्हेंबर) तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (KCR) यांच्या अधिकृत निवासस्थान संकुल कार्यालयाकडे मोर्चा काढला होता. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखलं. दरम्यान, वायएस शर्मिला म्हणजे, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी (YS Jagan Mohan Reddy) यांच्या बहीण.
वायएस शर्मिला यांनी हा मोर्चा तेलंगणातील सत्ताधारी टीआरएस कार्यकर्त्यांनी त्यांच्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या कथित हल्ल्याच्या निषेधार्थ काढला होता. वायएसआर तेलंगणा पक्षाच्या प्रमुखानं सोमवारी त्यांच्या राज्यव्यापी 'प्रजा प्रतिष्ठान' पदयात्रेदरम्यान वारंगल जिल्ह्यातील कथित हल्ल्याचा निषेध केला आणि त्यानंतर मंगळवारी तेलंगणा मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थान संकुल कार्यालयाकडे मोर्चा वळवला.
#WATCH | Hyderabad: Police drags away the car of YSRTP Chief Sharmila Reddy with the help of a crane, even as she sits inside it for protesting against the Telangana CM KCR pic.twitter.com/ojWVPmUciW
— ANI (@ANI) November 29, 2022
पोलिसांनी क्रेनच्या साह्यानं गाडी उचलली, त्यावेळी शर्मिला आतच बसल्या होत्या
या घटनेचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले होते. या व्हिडीओंमध्ये पाहायला मिळत होतं की, शर्मिला मोर्च्यादरम्यान एक गाडी चालवत होत्या. या गाडीच्या काचा फुटलेल्या होत्या. परंतु, मोर्चादरम्यान पोलिसांनी त्यांना थांबवलं आणि गाडीतून उतरण्यास सांगितलं. मात्र शर्मिला यांनी वाहनातून बाहेर येण्यास नकार दिला. त्यावेळी पोलिसांनी क्रेन आणून गाडी उचलली, त्यावेळी शर्मिला या गाडीतच होत्या. यावेळी पोलिसांनी वायएसआर तेलंगणा पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतलं.
शर्मिला यांच्या पदयात्रेत झालेला हल्ला
शर्मिला यांना काही वेळानं एसआर नगर येथील पोलीस स्थानकात नेण्यात आलं. ज्या रस्त्यावर वायएसआर तेलंगणा पार्टीचे नेते आणि कार्यकर्ते आंदोलन करत होते, त्याठिकाणी काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती. शर्मिला यांच्या राज्यव्यापी पदयात्रेसाठी वापरल्या जाणाऱ्या ताफ्यावर हल्ला करून आग लावण्यात आल्यानं वारंगल जिल्ह्यात सोमवारी काहीसा तणाव निर्माण झाला होता. तर एका वाहनाच्या खिडकीच्या काचा फोडण्यात आल्या.
दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता शर्मिला यांना पोलिसांनी थांबवलं आणि त्यांना परत जाण्यास सांगितलं होतं. त्यानंतर काही वेळानं पोलिसांच्या एस्कॉर्टसह त्यांना हैदराबादला परत पाठवण्यात आलं. नरसंपेट येथील टीआरएस आमदाराविरोधात शर्मिला यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करत सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जमले. त्याचवेळी कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी टीआरएस कार्यकर्ते आणि वायएसआर तेलंगणा पक्षाच्या कार्यकर्त्यांची गर्दी पांगवण्यास सुरुवात केली.
तेलंगणात पदयात्रा
वायएसआर तेलंगणा पक्षाच्या नेत्यानं आरोप केलाय की, सत्ताधारी टीआरएसच्या सदस्यांनी शर्मिलाच्या पदयात्रेदरम्यान विश्रांतीसाठी वापरल्या जाणार्या ताफ्यावर हल्ला केला आणि जाळपोळ केली. वायएसआर तेलंगणा पक्षानं सांगितलं की, संयुक्त आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वायएस राजशेखर रेड्डी यांची मुलगी आणि आंध्र प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांची बहीण शर्मिला यांनी पदयात्रा सुरू केली आहे. शर्मिला यांच्या पदयात्रेनं आतापर्यंत तेलंगणातील 75 विधानसभांमध्ये 3,500 किलोमीटरची यात्रा पूर्ण केली आहे.