नवी दिल्ली : देशात बहुतांश विद्यापीठांनी अंतिम वर्गाच्या परीक्षा घेण्याबाबत अनुकूलता दर्शवली आहे, तर 177 विद्यापीठांनी मात्र याबाबत अजून कुठलाही निर्णय घेतलेला नाही. अंतिम वर्गाच्या परीक्षा हा कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये संवेदनशील राजकीय मुद्दा बनलेला आहे. मात्र या अंतिम वर्गाच्या परीक्षांबाबत देशभरातल्या विद्यापीठांमध्ये नेमकी काय स्थिती आहे याची आकडेवारी आज यूजीसीनं जाहीर केली.


देशात एकूण 993 विद्यापीठं आहेत, त्यातल्या 640 विद्यापीठांच्या प्रतिसादावर यूजीसीनं ही आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार देशातल्या 182 विद्यापीठांनी आधीच अंतिम वर्गाची परीक्षा ( ऑनलाईन किंवा ऑफलाईन ) घेतलेली आहे. तर देशातले 234 विद्यापीठं ही परीक्षा येत्या ऑगस्ट सप्टेंबरमध्ये ऑनलाईन किंवा ऑफलाईन घेण्याच्या विचारात आहेत. त्यासोबतच ज्या विद्यापीठांना याबाबत काहीच निर्णय घेतलेला नाहीय, त्यांचीही संख्या मोठी आहे. देशात 177 विद्यापीठांनी याबाबत अजून कुठलाही निर्णय घेतलेला नाही.


अंतिम वर्गाच्या परीक्षा हा सध्या अनेक राज्यांमध्ये वादाचा विषय बनलेला आहे. 6 जुलैला यूजीसीनं याबाबत सुधारीत गाईडलाईन्स जाहीर केल्या आणि परीक्षा जुलैऐवजी सप्टेंबर पर्यंत घ्याव्यात असं म्हटलं. मात्र महाराष्ट्र, दिल्ली, ओडिशा या राज्यांनी या निर्णयाला विरोध केलाय. यूजीसीनं आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा असं म्हटलं होतं. राहुल गांधी, केजरीवाल यांनीही राष्ट्रीय पातळीवर या निर्णयाविरोधात आवाज उठवून परीक्षा रद्द करणंच विद्यार्थ्यांच्या हिताचं असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे अंतिम वर्गाच्या परीक्षाचं चित्र बऱ्याच ठिकाणी स्पष्ट नाही. त्या पार्श्वभूमीवर आज यूजीसीकडून ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. पण 993 पैकी 640 विद्यापीठांचाच प्रतिसाद यात नोंदवला गेला आहे हे ही लक्षात घ्यायला हवं.


संबंधित बातम्या :