मुंबई : कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थी हा घटक शैक्षणिक संस्थेचा केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्याचा स्वास्थ, भवितव्य आणि हिताचा विचार करून अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना योग्य त्या सूत्रांच्या आधारे पदवी प्रदान करण्याबाबत एकसमान मार्गदर्शक सूचना निर्गमित कराव्यात, अशी विनंती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्राद्वारे केंद्राकडे केली आहे.


विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) ने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात काल दिलेली मार्गदर्शक तत्वे म्हणजे सर्वांनाच धक्का आहे. महाराष्ट्रातील कोव्हिडची परिस्थिती माहित असताना हा निर्णय म्हणजे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळल्यासारखे आहे. म्हणून राज्यातील परिस्थितीबाबत परत केंद्र सरकारला पत्र लिहले असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता उच्च व तंत्रशिक्षण विभागाने शासन निर्णय घेऊन विद्यापीठ अंतिम वर्ष परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर यूजीसीच्या गाईडलाइन्सनुसार आता या परीक्षा सप्टेंबर अखेरीस घेण्यात याव्या अशा सूचना यूजीसीने दिल्यानंतर परीक्षांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.


विद्यापीठ परीक्षांसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाची परवानगी





'महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, सध्या राज्यामध्ये दोन लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये परीक्षा घेणे हे राज्यातील 10 लाख विद्यार्थ्यांच्या दृष्टीने व्यवहार्य नाही. बहुतांश कॉलेज, शैक्षणिक संस्था, हॉस्टेल हे क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरण्यात येत आहेत. तसेच अनेक विद्यार्थी हे आपल्या गावी गेले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना गावाहून येणे व त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करणे शक्य नसल्याने परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांना संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यापूर्वीच्या पत्रामध्ये मी परीक्षा रद्द करण्याबाबत आपल्याला विनंती केली होती. पंजाब, हरियाणा, राजस्थान, उडिसा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांनी तसेच आयआयटीने अंतिम परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे.' अशा आशयाचा पत्र  उदय सामंत यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल यांनी लिहिलं आहे.


विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचना या पूर्वीच्या सूचनांप्रमाणे बंधनकारक नसून मार्गदर्शन स्वरूपाच्या असल्याच मत सामंत यांनी पत्रात व्यक्त केलं. शिवाय, याआधी राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या अन्य सत्रांच्या गुणांचे मूल्यांकन करून निकाल जाहीर करण्याचे ठरवले होते. तसेच एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षा द्यायची असल्यास तशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे या महामारीच्या काळात विद्यार्थी हा घटक शैक्षणिक संस्थेचा केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्याचा स्वास्थ, भवितव्य आणि हिताचा विचार करून अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना योग्य त्या सूत्रांच्या आधारे पदवी प्रदान करण्याबाबत एकसमान मार्गदर्शक सूचना निर्गमित कराव्यात, अशी विनंती उदय सामंत यांनी पत्राद्वारे केंद्राकडे केली आहे.