Himachal Pradesh : राजीनामा दिला नाही, सरकार पाच वर्षे टिकेल; हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू यांचा दावा, आतापर्यंत काय घडलं?
Himachal Pradesh Political Crisis : हिमाचल प्रदेशमध्ये भाजपने ऑपरेशन लोटस राबवायला सुरूवात केल्यानंतर आता काँग्रेसचे सरकार अल्पमतात आल्याचा दावा करण्यात येतोय.
शिमला: राज्यसभेच्या निवडणुकीनंतर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसमध्ये फूट (Himachal Pradesh Political Crisis) पडल्याचं स्पष्ट झालं असून त्या ठिकाणी भाजपकडून आता ऑपरेशन लोटस राबवण्यात येत आहे. एकीकडे हिमाचलच्या विधानसभा अध्यक्षांनी भाजपच्या 15 आमदारांचं निलंबन केलं तर दुसरीकडे काँग्रेसचे मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी राजीनामा दिला. अशा वेळी काँग्रेसचे सरकार अल्पमतात आलं असून मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू (Sukhvinder Singh Sukhu) यांनी राजीनामा दिल्याच्या बातम्या येत आहेत. त्यावर स्पष्टीकरण देताना आपण मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसून हे सरकार पाच वर्षे टिकेल असा दावा सुखू यांनी केला आहे.
आपल्याकडे पूर्ण बहुमत असून काँग्रेसचे सरकार पाच वर्षे टिकेल असं सुखविंदर सिंह सुखू यांनी म्हटलं आहे. राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या सहा आमदारांनी आणि सरकारला पाठिंबा दिलेल्या तीन अपक्षांनी क्रॉस व्होटिंग केल्याने बहुमत असूनही काँग्रेसच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता हिमाचलमध्ये ऑपरेशन लोटस सुरू असल्याचं सांगितलं जातंय.
काँग्रेसच्या मंत्र्याच्या राजीनामा
सुखू मंत्रिमंडळातील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून त्यांच्या राजीनाम्यानंतर हिमाचलमधील काँग्रेसमधील कलह चव्हाट्यावर आला. यानंतर त्याच्याबद्दल विविध प्रकारच्या अटकळ बांधल्या जाऊ लागल्या. विक्रमादित्य हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे.
#WATCH | Himachal Pradesh CM Sukhvinder Singh Sukhu says "One of the MLAs (who voted for BJP candidate in RS polls) has said to forgive him as he has betrayed the party...People of the state will give them an answer..."
— ANI (@ANI) February 28, 2024
On Vikramaditya Singh's resignation, CM says, "I have… pic.twitter.com/PUKB45jd0M
आवाजी मतदानाने अर्थसंकल्प मंजूर
हिमाचल प्रदेश विधानसभेत बुधवारी आवाजी मतदानाने अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. यावेळी विरोधी पक्षाचा एकही सदस्य सभागृहात उपस्थित नव्हता. त्यामुळे हिमाचल प्रदेश विधानसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले. अर्थसंकल्पीय अधिवेशन नियोजित वेळेच्या एक दिवस आधी संपले. 14 फेब्रुवारीला अधिवेशन सुरू झालं होतं.
भाजपचे 15 आमदार निलंबित
सभापती कुलदीप सिंह पठानिया यांनी विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांच्यासह 15 भाजप आमदारांना निलंबित केले. विपिन परमार, विनोद कुमार, हंस राज, जनक राज, बलबीर वर्मा, त्रिलोक जामवाल, दीप राज, सुरिंदर शौरी, पूरण ठाकूर, इंदर सिंग गांधी, दिलीप ठाकूर, रणधीर शर्मा, लोकेंद्र कुमार आणि रणवीर यांनाही निलंबित करण्यात आले आहे. खरे तर, संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन चौहान यांनी सभापतींचा अपमान आणि त्यांच्याशी गैरवर्तन केल्याबद्दल भाजप सदस्यांच्या निलंबनाची मागणी केली होती आणि त्याबाबतचा प्रस्तावही आणला होता. ते म्हणाले की, सभागृह सुरळीत चालण्यासाठी या आमदारांचे निलंबन झाले पाहिजे.
काँग्रेस सरकार अल्पमतात
सहा आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्यानंतर हिमाचलमधील काँग्रेस सरकार अल्पमतात आल्याचा दावा भाजपने केला आहे. भाजपच्या विरोधी पक्षनेत्यांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला आहे.
हिमाचलमधील पक्षीय बलाबल
- एकूण संख्या - 68
- काँग्रेस- 40
- भाजप- 25
- अपक्ष - 3
काँग्रेसचे 40 आणि तीन अपक्ष असे मिळून 43 जणांचा पाठिंबा सुखू सरकारला आहे. असं असलं तरीही यातील एकूण 9 आमदारांनी भाजपच्या बाजूने मतदान केल्याने आणि एक मंत्र्याने राजीनामा दिल्यानंतर आता सरकारकडे फक्त 33 आमदार राहिले आहेत. यापैकीही काही आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा भाजपने केला आहे.
ही बातमी वाचा: