(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राहुल आणि प्रियंका गांधींकडून पीडित कुटुंबाची भेट, म्हणाले.. न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार
आज काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली.पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार.
नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी शनिवारी सायंकाळी हाथरसमध्ये मानवी पशूंची शिकार झालेल्या पीडितेच्या कुटुंबियांची भेटी घेतली. राहुल आणि प्रियंकाने पीडितेचा भाऊ, वडील आणि आईशी बंद खोलीत सुमारे एक तास संवाद साधला. यावेळी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरीही त्यांच्यासमवेत तेथे होते.
पीडित कुटुंबाशी झालेल्या भेटीदरम्यान प्रियंका गांधी यांनी पीडित मुलीच्या आईला मिठी मारली आणि त्यांचं दु:ख वाटण्याचा प्रयत्न केला. पीडित कुटुंबाच्या घराबाहेर सुरक्षेचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चर्चेवेळी राहुल यांनी पीडितेच्या कुटुंबाला विचारले की तुम्हाला न्याय मिळेल असे तुम्हाला वाटते का? त्यावर तुम्ही आम्हाला न्याय मिळवून द्या, असे कुटुंबीय म्हणाले,
चर्चेनंतर राहुल गांधी म्हणाले, "आम्ही पीडित कुटुंबासमवेत आहोत. सरकार त्यांना घाबरवत आहे, त्यांना धमकावत आहेत. त्यांचे संरक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. यूपी सरकार सुरक्षा देण्यात अपयशी ठरत आहे. कुटुंबाला धमकावून त्यांची सही घेतली आहे. तर पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर प्रियंका गांधी म्हणाल्या, "पीडितेच्या कुटुंबाला न्यायालयीन चौकशी हवी आहे. कुटुंबाला मुलीचा चेहरादेखील दिसू शकला नाही. पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरुच राहणार आहे."
Hathras case | हाथरस प्रकरणात योगी सरकारकडून सीबीआय चौकशीचे आदेश
दोन दिवसांपूर्वी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पीडित मुलीच्या कुटुंबाला भेटण्यासाठी हाथरस येथे जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना उत्तर प्रदेश सरकारने जाऊ दिले नाही. आज जेव्हा राहुल आणि प्रियंका हाथरसकडे रवाना झाले तेव्हा त्यांना पुन्हा एकदा डीएनडी वर रोखण्यात आले होते. मात्र, त्यांनी परत जाण्यास नकार दिला. त्यानंतर यूपी सरकारने पाच जणांना हाथरसला जाण्याची परवानगी दिली.
डीजीपी आणि गृहसचिव यांनीही कुटुंबीयांची भेट घेतली यूपीचे डीजीपी आणि गृहसचिव अवनीश अवस्थी यांनी पीडितेच्या कुटुंबाशी भेट घेतली होती आणि त्यांच्या तक्रारी आणि त्यांच्या मागण्या ऐकल्या आहेत. कुटुंबाची भेट घेतल्यानंतर अधिकाऱ्यांनी पीडित कुटुंबाच्या सर्व मागण्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोर ठेवल्या, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी रात्री उशिरा सीबीआय चौकशीचे आदेश दिले. यापूर्वी यूपी सरकारने या प्रकरणाची एसआयटी चौकशीचे आदेश दिले होते. मात्र, पोलिसांवर त्यांचा विश्वास नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
CBI Inquiry for Hatras Case | उत्तर प्रदेश सरकारडून हाथरस प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची शिफारस