Hallmarking of Gold : आजपासून 14, 18 आणि 22 कॅरेट सोन्याचीच विक्री, हॉलमार्क म्हणजे काय?
केंद्र सरकारने हॉलमार्क अनिवार्य केल्याने देशात आजपासून केवळ 14, 18 आणि 22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचीच विक्री होणार आहे. गोल्ड हॉलमार्किंग काय आहे हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर त्याचं उत्तर जाणून घेऊया.
Hallmarking Of Gold : गोल्ड हॉलमार्किंग आजपासून (15 जून) अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला जर सोनं खरेदी करायचं असेल तर आजपासून तुम्हाला हॉलमार्क असलेलं सोनंच मिळणार आहे. हॉलमार्क सोन्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यावर सोनं किती कॅरेटचं आहे याचा उल्लेख असतो. याशिवाय दागिन्यांनांमध्ये किती टक्के सोनं आहे हे देखील नमूद असतं.
आजपासून हॉलमार्क नसलेले दागिने विकणे किंवा विनापरवाना सोन्याचे दागिने विकणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. बीआयएसच्या नियमानुसार परवान्याशिवाय सोन्याचे दागिने विकणे किंवा नॉन हॉलमार्क दागिने विकणाऱ्या सराफांविरोधात मालाची जप्ती, पाच लाख रुपयांपर्यंत दंड आणि तुरुंगवासाची तरतूद करण्यात आली आहे.
जाणून घेऊया सोनं कसं ओळखावं?
गोल्ड हॉलमार्किंग म्हणजे काय?
गोल्ड हॉलमार्किंग काय आहे हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर त्याचं उत्तर जाणून घेऊया. हॉलमार्क हे सोन्याच्या शुद्धतेचं मानक आहे. याअंतर्गत प्रत्येक सोन्याच्या दागिन्यावर किंवा कलाकृतीवर भारतीय मानक ब्युरो (BIS) आपल्या मार्कद्वारे शुद्धतेची ग्वाही देतं. सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार सर्व सराफांना सोन्याचे दागिने किंवा इतर कलाकृती विकण्यासाठी बीआयएसचं मानक पूर्ण करावं लागणार आहे. हॉलमार्क अनिवार्य झाल्याने देशात आता केवळ 14, 18 आणि 22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचीच विक्री होईल.
सोनं कसं ओळखाल?
प्रत्येक कॅरेटच्या सोन्यासाठी हॉलमार्क नंबर निश्चित केले जातात. सराफांकडून 22 कॅरेटसाठी 916 क्रमांकाचा वापर केला जातो. तर 18 कॅरेटसाठी 750 क्रमांकाचा आणि 14 कॅरेटसाठी 585 क्रमांक वापरला जातो.
हॉलमार्कचा सामान्य ग्राहकांना काय फायदा?
दागिन्यांमध्ये किती टक्के सोने आणि किती टक्के इतर धातूचा वापर केला आहे हे हॉलमार्कमध्ये दिलेल्या क्रमांकावरुन समजतं. यावरुन हॉलमार्किंग म्हणजे सरकारने सोन्याच्या दागिन्यांवर दिलेली गॅरंटी आहे, असं आपण म्हणू शकतो. याचा सामान्य ग्राहकांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते जे दागिने खरेदी करतील त्यावर जेवढ्या कॅरेटच्या शुद्धतेचा उल्लेख केला आहे तेवढ्याच शुद्धतेचं सोनं त्यांना मिळतं.
दागिन्यांमध्ये किती टक्के सोनं? जाणून घ्या असं!
तर दागिन्यांमध्ये किती टक्के सोन आणि किती टक्के इतर धातू आहे हे कसं समजायचं? जर दागिन्यावर 375 नंबर लिहिला असे तर त्यात 37.5 टक्के शुद्ध सोनं आहे. तर 585 नंबर दिसत असेल तर त्यात 58.5 टक्के शुद्ध सोन्याचा वापर केलेला असतो. जर एखाद्या दागिन्यावर 750 लिहिलेलं असेल तर त्याचा अर्थ झाला की, दागिना बनवण्यासाठी 75 टक्के सोन्याचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय 916 लिहिलं असेल तर दागिन्यात 91.6 टक्के शुद्ध सोनं असतं. उर्वरित टक्क्यांमध्ये इतर धातूंचा समावेश असतो जे दागिने बनवण्यासाठी वापरले जातात.