एक्स्प्लोर
आपले हॉटेल गोव्यात आहे हे नितेश यांनी विसरु नये, शिवसेनेचा इशारा
सिंधुदुर्गातील अनेक तरुण-तरुणी गोव्यात औद्योगिक वसाहतींमध्ये कारखान्यात तसेच इतरत्र नोकरीसाठी येत असतात, हे नितेश यांनी आधी लक्षात घ्यावे आणि नंतरच बोलावे असा इशारा कामत यांनी दिला आहे.

पणजी : गोव्यात मासळी आयातीच्या प्रश्नावर सरकारने कडक निर्बंध घातल्याच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील आमदार नितेश राणे यांनी गोवा पासिंगचे एकही वाहन सिंधुदुर्गातून जाऊ देणार नाही, असा इशारा दिल्यानंतर त्यांच्या या विधानाचा गोवा शिवसेनेसोबत गोव्यातील मंत्री, आमदारांनी कडक शब्दात समाचार घेतला आहे. शिवसेनेचे गोवा राज्यप्रमुख जितेश कामत यांनी नितेश राणे यांच्या या विधानाचा निषेध करताना नारायण राणे यांचाही गोव्यात हॉटेल व्यवसाय आहे, याकडे लक्ष वेधले आहे. अशा प्रकारच्या धमक्या देऊ नयेत, असेही ते म्हणाले. शेजारी सिंधुदुर्गातील अनेक तरुण-तरुणी गोव्यात औद्योगिक वसाहतींमध्ये कारखान्यात तसेच इतरत्र नोकरीसाठी येत असतात, हे नितेश यांनी आधी लक्षात घ्यावे आणि नंतरच बोलावे असा इशारा कामत यांनी दिला आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही इशाऱ्याला किंवा दबावाला गोवा सरकार बळी पडणार नाही, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे आणि नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई यांनी स्पष्ट केले आहे. सरकारात घटक असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सर्वेसर्वा बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनीही गोव्याने मासळी आयातीबाबत कडक पावले का उचलली याचा नितेश राणे यांनी आधी गांभीर्याने विचार करावा, असे म्हटले आहे. आयात मासळी टिकवून ठेवण्यासाठी फॉर्मेलीन रसायनाचा वापर केला जातो हे रसायन आरोग्यास धोकादायक आहे. १२ जुलै रोजी मडगाव येथे घाऊक मासे बाजारात हा प्रकार आढळून आल्यानंतर गोव्यात खळबळ उडाली होती. अन्न व औषध प्रशासनाची नोंदणी तसेच मासे व वाहन इन्सुलेटेड असल्याशिवाय गोव्यात मासळी आयात करता येत नाही. या दोन्ही गोष्टी नसल्यास सीमेवरच मासळीवाहू वाहने अडवून परत पाठवली जात आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
कोल्हापूर
राजकारण
व्यापार-उद्योग























