वास्को: गोवा शिपयार्ड भारतीय लष्करासाठी 12 'अॅडव्हान्स फास्ट पेट्रोल क्राफ्ट' नौका बनवणार आहे. यामुळे भारतीय लष्कराला लडाख तथा इतर भागातील विशेष मोहिमा राबवण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे. विशेषत: लडाख भागात चीन लष्कराच्या वाढत्या कारवायांवर नजर ठेवण्यासाठी आणि भारताच्या हद्दीत दुर्गम प्रदेशात असणाऱ्या सरोवर आणि खाडीमध्ये गस्त घालण्याकरिता भारतीय लष्कराला या नौकांचा उपयोग होऊ शकतो. एका नौकेमध्ये एक प्लाटून म्हणजेच अंदाजे 30 भारतीय लष्कराचे जवान मोहिमेवर जाऊ शकतील.


या नौका बनवण्याची निविदा प्रक्रिया पार पडली असून संरक्षण मंत्रालयांतर्गत काम करत असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील जहाजबांधणीत अग्रगण्य असलेल्या गोवा शिपयार्डला हे कंत्राट मिळणार असल्याचं स्पष्ट झालंय. गोवा शिपयार्डने ट्वीटद्वारे ही माहिती दिली. या संदर्भात अधिक माहितीसाठी गोवा शिपयार्डचे जनसंपर्क अधिकारी निखिल वाघ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या बातमीला दुजोरा दिला.





गोवा शिपयार्डला प्रथमच भारतीय लष्करासाठी नौका बांधण्याची संधी मिळाली आहे. यापूर्वी गोवा शिपयार्डने अनेक अत्याधुनिक आणि उत्तम दर्जांचे जहाज भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल तसेच इतर काही देशांच्या संरक्षण दलासाठीदेखील तयार केली आहेत.


याबरोबरच गेल्या महिन्यात गोवा शिपयार्ड लिमिटेडने भारतीय नौदलासाठी प्रगत क्षेपणास्त्राने सज्ज असणाऱ्या फ्रिगेट जहाज बांधणीच्या प्रकल्पाला सुरुवात केली आहे. भारतीय नौदलासाठी रशियाच्या डिझाईन आणि तांत्रिक सहाय्याच्या माध्यमातून दोन क्षेपणास्त्र फ्रिगेट जहाज बांधण्याचा करार गोवा शिपयार्ड लिमिटेड आणि संरक्षण मंत्रालय यांच्यात जानेवारी 2019 मध्ये झाला होता. भारतीय संरक्षण जहाजबांधणी उद्योगासाठी हा एक महत्त्वपूर्ण प्रकल्प असल्याचं मानलं जातं.


मेक इन इंडिया आणि देशाच्या आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत हा प्रकल्प गोवा शिपयार्ड लिमिटेड पूर्ण करणार आहे. विशेष म्हणजे गोवा शिपयार्डच्या इतिहासातही आतापर्यंत हाती घेतलेल्या प्रकल्पांमध्ये हा सर्वात मोठा प्रकल्प असून यामुळे गोवा शिपयार्डला अनेक मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतील. भारतीय सशस्त्र दलासाठी अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे प्लॅटफॉर्म बनविण्याच्या क्षेत्रात हे एक महत्वाचं पाऊल असेल. या अतंर्गत पहिले जहाज 2026 मध्ये नौदलाच्या ताफ्यात दिले जाईल. फ्रिगेट प्रकल्प ही भारतीय नौदलाला सामर्थ्य मिळवण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल असेल. गोवा आणि देशभरातील स्वदेशी जहाज बांधणी क्षेत्राला या प्रकल्पातून चालना मिळेल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील.


कोरोनाच्या संकटकाळातही गोवा शिपयार्डने देशाच्या संरक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात पाच गस्ती जहाजांच्या प्रकल्पातील दोन गस्ती जहाजं सुपुर्द करण्यात आली आहेत. प्रतिकूल परिस्थितीतही वेळेत जहाजं पूर्ण करून दिल्याने जहाजबांधणी क्षेत्रात गोवा शिपयार्डने वेगळे स्थान निर्माण केले आहे.


संबंधित बातम्या: