Goa Liberation Day: भारत देश ब्रिटीशांच्या जोखडातून मुक्त झाल्यानंतर देशभर स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा केला जात होता. पण हैदराबादच्या संस्थानाचा विषय आणि गोव्याचे स्वातंत्र्य हे प्रश्न भारतासमोर उभे होते. यापैकी हैदराबाद संस्थानात भारत सरकारने पोलीस कारवाई करत 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाच्या तावडीतून मुक्त केलं. पण गोव्याला मात्र स्वातंत्र्यासाठी पुढची 14 वर्षे वाट पहावी लागली. गोवा अजूनही स्वातंत्र्य झाला नव्हता. आंदोलकांचा सत्याग्रह आणि लष्करी कारवाईच्या माध्यमातून अखेरीस 19 डिसेंबर 1961 साली गोवा पोर्तुगीजांपासून मुक्त झाला. याच कारणामुळे दरवर्षी 19 डिसेंबर हा गोवा स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो.


भारताच्या शोधात निघालेल्या वास्को-दा-गामाने 1498 साली भारतात पहिलं पाऊल टाकलं. इ.स. 1510 साली पोर्तुगीजांनी भारतात व्यापारी वसाहत स्थापन करण्याच्या उद्देशाने गोव्यात प्रवेश केला. त्यावेळी गोव्यावर विजापूरच्या आदिलशहाचे राज्य होतं. अत्याधुनिक शस्त्रांस्त्रांचा वापर करुन पोर्तुगीजांनी आदिलशाहाच्या सत्तेला गोव्यातून हाकलून लावलं आणि गोव्यावर आपलं वर्चस्व निर्माण केलं. तेव्हापासून जवळपास 450 वर्षे पोर्तुगीजांनी गोव्यावर राज्य केलं.


संपूर्ण भारत 1947 साली पारतंत्र्यातून मुक्त झाला तरी गोव्याला मुक्त व्हायला मात्र पुढचे 14 वर्षे झगडावं लागलं.


गोव्याला स्वातंत्र्य उशीरा का मिळाले?
भारतावर ब्रिटिशांचं राज्य असलं तरी गोवा आणि दमण-दीववर पोर्तुगीजांची सत्ता होती. 15ऑगस्ट 1947 ला ब्रिटिशांनी भारतातील आपली सत्ता सोडली. त्यानंतरच्या काळात काश्मीर, जुनागड, हैदराबाद अशी जवळपास 550 संस्थानं भारतात सामील झाली. पण गोवा काही भारतात सामील झालं नव्हतं. भारताने केलेलं आवाहन नाकारत पोर्तुगीजांनी गोव्यातील आपली सत्ता सोडण्यास नकार दिला. गोव्यातील जनता अद्यापही गुलामीचे चटके सहन करत होती.


सत्याग्रहाच्या माध्यमातून लढा
गोव्यातील ही परिस्थिती इतर भारताच्या तुलनेत वेगळी आहे हे लक्षात आल्यानंतर डॉ. राम मनोहर लोहिया यांनी गोवा मुक्तीसंग्रामात उडी घेतली. त्या आधी गोव्यातील नागरिकांनी पोर्तुगीज सत्तेविरुध्द छुपा लढा सुरु केला होता पण डॉ. राम मनोहर लोहियांच्या सहभागाने गोवा मुक्ती संग्रामाची ठिणगी पडली. त्यांना गोव्यात भाषणबंदी असतानाही भाषणाचा धडाका लावला. डॉ.टी. बी कुन्हा, पुरुषोत्तम काकोडकर, डॉ. ज्युलिओ मिझेनीस आणि इतर नेते गोवा कॉंग्रेस कमिटीच्या माध्यमातून या लढ्यात सत्याग्रही पद्धतीने सक्रिय होते.


डॉ. टी. बी. कुन्हा यांनी गोव्यातील पोर्तुगीज सत्तेविरोधात अंहिसात्मक मार्गाने लढा पुकारला. त्यांना गोव्यातील राष्ट्रवादी चळवळीचे जनक मानलं जातं. डॉ. कुन्हा यांनी गोवा मुक्ती चळवळीला प्रोस्ताहन मिळावं म्हणून 'आझाद गोवा' आणि 'स्वतंत्र गोवा' या नावाची दोन वृत्तपत्रं सुरु केली. पोर्तुगीज सरकारनं त्यांना अटक केली आणि तुरुंगात टाकलं.


गोवा मुक्ती संदर्भात पंडित नेहरुंची भूमिका शांततेनं चर्चा करण्याची होती. पण पोर्तुगीज सरकार त्याला काही दाद देत नव्हतं. गोव्यातील काही तरुणांनी 'आझाद गोमंतक दल' नावाची सशस्त्र संघटना सुरु केली.


महाराष्ट्राचा सहभाग
गोवा मुक्ती लढ्याचं वैशिष्ट्य म्हणजे यात महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी सहभाग घेतला. महाराष्ट्रातील डाव्या व समाजवादी विचारांच्या नेत्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून गोवा मुक्ती संग्रामात भाग घ्यायचं ठरवलं. त्यासाठी नियोजनबध्द कार्यक्रमही आखण्यात आला. सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली 1955 साली आंदोलकांची पहिली तुकडी गोव्याला रवाना झाली. त्या आंदोलकांना गोव्याच्या सीमेवरच पोर्तुगीजांनी अटक केली. पण एकामागे एक अशा असंख्य स्वातंत्र्यसैनिकांच्या तुकड्या गोव्याकडे येतच राहिल्या. महत्वाचं म्हणजे यात महिलांचा मोठा सहभाग होता.


लष्करी कारवाईसाठी दबाव
गोवा स्वातंत्र्य करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरु केलं. गोव्यातील सत्ता पोर्तुगीजांनी सोडावी यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव येत होता. त्याचप्रमाणे भारताने गोव्यात लष्करी कारवाई करावी यासाठीही भारत सरकारवर आता दबाव येत होता. गोव्यातील सर्व पक्षीय बैठकीत लष्करी कारवाई करण्यात यावी यासाठी ठराव करण्यात आला. आता कोणत्याही क्षणी गोव्यावर लष्करी कारवाई होऊ शकते असं वातावरण तयार झालं.


स्वातत्र्यसैनिकांचा लढा सुरुच होता. अखेरीस 18 डिसेंबर 1961 रोजी भारत सरकारने लष्कराला कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार लष्कराने गोव्याच्या सर्व सीमा ताब्यात घेतल्या. एकीकडे भारतीय लष्कर आणि दुसरीकडे स्वातंत्र्यसैनिक अशा दुहेरी कोंडीत पोर्तुगीज सरकार सापडलं होतं. त्यांनी इंग्लड आणि अमेरिकेकडे मदत मागितली. पण जगातले अनेक राष्ट्र स्वातंत्र्य होत असताना पोर्तुगीजांनी गोव्यावर सतेत राहणं चुकीचं आहे अशा प्रकारचा मतप्रवाह आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झाला होता.


पोर्तुगीजांची शरणागती
शेवटी हतबल झालेल्या पोर्तुगीज सरकारने शरणागती पत्करली. 19 डिसेंबर 1961 रोजी रात्री दहा वाजता पोर्तुगीज गव्हर्नर वासेल द सिल्वा यांनी शरणागतीच्या दस्तावेजावर सही केली आणि ते भारतीय लष्कर प्रमुखांकडे सुपूर्त केले. अशा प्रकारे पोर्तुगीजांच्या साडेचारशे वर्षांच्या गुलामगिरीतून गोवा अखेरीस मुक्त झाला.


महत्वाच्या बातम्या: