वाराणसी : आपली संस्कृती, अध्यात्म आणि वारसा यामुळं जगभरात प्रसिद्ध बाबा विश्‍वनाथ यांची काशी अर्थात वाराणसीच्या कामगारांचा बोलबाला रोम आणि अमेरिकेत होतोय. इथं बनणाऱ्या अनेक आभूषणांचे चाहते देश विदेशात आहेत. वाराणसीतील वस्त्रांचे देखील चाहते जगभरात आहेत. विशेष म्हणजे, रोम, ग्रीस आणि अमेरिकेतील पादरी मागील 15 वर्षांपासून वाराणसीमध्ये तयार केले जाणारे गाऊन घालत आहेत. बनारसी वस्त्र सर्वांनाच आकर्षित करतात. वाराणसीमध्ये सिल्‍कपासून बनवले गेलेले कपडे डिझायनर लोकांची पहिली पसंती असते.


ख्रिसमसचा सण ख्रिस्ती बांधवांसाठी सर्वात मोठा सण मानला जातो. या पावन पर्वावर रोम, ग्रीस आणि अमेरिकेतील पादरी मागील 15 वर्षांपासून वाराणसीमध्ये तयार केले जाणारे गाऊन घालत आहेत. वाराणसीतील आदमपूर परिसरातील सय्यद हुसैन हे पादरींसाठी खास गाऊन बनवतात. सोबतच जरदोजी, ब्राकेट, सिल्‍कपासून तयार केल्या जाणाऱ्या टोप्या, लबेदा देखील येथील कारागीर तयार करतात. 2005 साली सय्यद हुसैन कपड्यांचा स्टॉल घेऊन एका प्रदर्शनात लावण्यासाठी ग्रीस आणि रोमला गेले होते. त्यावेळी त्यांनी तिथल्या डिझायनरांना काही डिझाईन दाखवले. तिथल्या डिझायनरांनी त्यांना त्यात काही बदल सांगितले. आणि गाऊनची ऑर्डर दिली. त्यानंतर ज्यावेळी हे गाऊन तयार झाले त्यावेळी ते विदेशी लोकांना फार आवडले. तेव्हापासून आजपर्यंत तिथले पादरी काशीमधील जरदोजीपासून तयार केलेले वस्त्रच परिधान करतात.



हातावर डिझाईन केलं जातं
वाराणसीमध्ये तयार होणारे गाऊन किंवा टोप्यांना सर्व कामगार आपल्या हातावर डिझाईन करतात. विदेशांमधून वाराणसीच्या या कारागीरांकडे जवळपास एक वर्ष आधी ऑर्डर केली जाते. ख्रिसमसच्या आधी हे कारागीर बनवलेली वस्त्र रोम, ग्रीस आणि अमेरिकेला पाठवतात.


‘वोकल फॉर लोकल’ आणि ओडीओपी या मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांनी सणासुदीच्या काळात या योजनांअंतर्गत उत्पादनांची खरेदी करुन एकमेकांना गिफ्ट देण्याचं आवाहन केलं होतं. यानंतर देशासह विदेशात देखील या आवाहनाला जोरदार प्रतिसाद मिळाला आणि लोकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे.