Corona Cases India Stats साधारण वर्षभरापासून जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसनं पाहता पाहता भारतालाही विळखा घातला. एक, दोन, दहा... अशा वेगान झपाट्यानं वाढणारी रुग्णसंख्या आता चिंता वाढवणाऱा आकडाही ओलांडून गेली आहे. त्यामुळं देशाची वाटचाल नेमकी कोणत्या दिशेनं, असाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार देशातील कोरोनाबाधितांनी तब्बल 1 कोटींचा आकडा ओलांडला आहे.


मागील 24 तासांमध्ये देशभरात कोरोनाचे 25,153 नवे रुग्ण आढळून आले. नव्यानं कोरोनाची लागण होणाऱ्यांचा आकडा देशात काही अंशी कमी होताना दिसत आहे. पण, वैश्विक पातळीवर तुलनेनं भारतातील एकूण कोरोबाधितांचा आकडा मात्र लक्ष वेधणारा ठरत आहे. आतापर्यंत देशभरात कोरोनाची लागण झाल्यामुळं 1,45,136 जणांचा मृत्यू झाला आहे.





कोरोनाची लागण होऊन या विषाणूच्या संसर्गातून सावरणाऱ्यांचा आकडा 95,50,712 वर पोहोचला आहे. तर, देशात सध्याच्या घडीला 3,08,751 कोरोनाबाधित रुग्णांवर विविध पद्धतींनी उपचार सुरु आहेत. अमेरिकेमागोमाग भारत एक कोटी कोरोना रुग्णांचा आक़डा ओलांडणारा दुसरा देश ठरला आहे.


कोविड 19चा संसर्ग होणाऱ्या रुग्णांच्या रिकव्हरी रेटबद्दल सांगावं तर, हे प्रमाण 95.46 टक्क्यांवर पोहोचलं आहे. या तुलनेनं देशात सक्रिय रुग्णांची संख्या कमी असल्याचं लक्षात येत आहे. कोरोनामुळं मृत्यू होणाऱ्यांची संख्याही देशात तुलनेनं कमी आहे. त्यामुळं काही अंशी देशाला या कोरोनाच्या विळख्यातून दिलासा मिळत असल्याची चिन्हं आहेत. पण, अनेक ठिकाणी नागरिकांचा हलगर्जीपणा आणि त्यामुळं पुन्हा (Coronavirus)चा संसर्ग होण्याचं संकट काही टळलेलं नाही ही बाबही तितकीच महत्त्वाची.


देशात लसीकरणाच्या हालचालींना वेग


स्वदेशी आणि परदेशी बनावटीच्या लसींना देशात अधिकृत परवानगी मिळाल्यानंतर तातडीनं लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. त्यासाठी विविध स्तरावर तयारी केली जात असून, देशातील नागरिकांना कोरोनामुक्तीच्या दिशेनं सरकार सक्रिय असल्याचं स्पष्ट होत आहे. तेव्हा आता कोरोना लसीला केंद्राची अधिकृत परवानगी मिळून नेमकं हे लसीकरण केव्हा सुरु होतं याकडेच साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.