Goa Election Result 2022 : गोव्यात गेल्या निवडणुकीत चांगली कामगिरी करणाऱ्या काँग्रेसची यंदा फारशी कामगिरी झाली नाही. काँग्रेसला गोव्यात फक्त 11 जागांवर विजय मिळवता आला आहे. यावेळी गोव्यात आपले सरकार स्थापन होईल, अशी काँग्रेसला आशा होती. परंतु, तसे झाले नाही. गोव्यातील पराभवावर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काँग्रेसचे जेष्ठ नेते पी. चिदंबरम (P Chidambaram) यांनी गोव्यातील पराभवावर मोठे वक्तव्य केले आहे.
"आम्हाला गोव्यातील जनतेचा निर्णय मान्य आहे. आमच्या उमेदवारांनी अनेक प्रतिकूल परिस्थितींशी धैर्याने लढा देत निवडणूक लढवली आहे. लोकांनी भाजपला सत्तेत आणण्यासाठी मतदान केले आहे. जनतेचा हा कौल आम्ही स्वीकारत आहोत. अनेक मतदारसंघात आम्ही अत्यंत कमी फरकाने पराभूत झालो आहोत." असे चिदंबरम यांनी म्हटले आहे.
गोवा विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष असल्याचे दिसत आहे. राज्यात विधानसभेच्या 40 जागांपैकी भाजपने 20 जागा जिंकल्या आहेत. बहुमत मिळवण्यासाठी 21 जागांची गरज आहे. तीन अपक्षांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे गोव्यात भाजप सत्ता स्थापन करेल.
दरम्यान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे काँग्रेसला या पाच पैकी एकाही राज्यात सरकार स्थापन करता येणार नाही. पाच राज्यांतील निकालावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
"जनतेने दिलेला कौल आम्ही स्वीकारला आहे. ज्यांनी विजय मिळवला त्यांचे अभिनंदन. मी सर्व काँग्रेस कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांचे त्यांच्या कठोर परिश्रमाबद्दल आभार मानतो. या निकालातून आम्ही शिकू आणि लोकांच्या हितासाठी काम करत राहू." असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.
पाच राज्यांच्या निकालानंतर काँग्रेसने पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला म्हणाले, "गोवा आणि उत्तराखंडमधून धडा मिळाला आहे की, आम्हाला स्थानिक पातळीवर काम करण्याची गरज आहे. पराभव झाला असला तरी आम्ही जबाबदारीने समाजाच्या समस्या मांडत राहू."
महत्वाच्या बातम्या
- Goa Election Result 2022 Live Updates : गोव्यातील भाजपच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस
- Goa Winner List : गोव्यात पुन्हा भाजपला संधी, गोव्यातील विजयी उमेदवारांची यादी येथे पाहा
- Goa Election Result 2022 : अपक्षांना आम्ही सोबत घेणार, विजयानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची प्रतिक्रिया
- Election Result 2022 LIVE: देशातील सत्तेच्या सेमीफायनलचा आज फैसला, पाच राज्यांचे जलद निकाल पाहण्यासाठी क्लिक करा