Punjab Election Results 2022 LIVE : पंजाबमध्ये आम आदमी पक्ष पहिल्यांदाच आपले सरकार स्थापन करणार आहे. आम आदमी पक्षाने मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केलेले भगवंत मान यांनी ऐतिहासिक विजयानंतर शहीद भगतसिंग यांच्या गावात मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे जाहीर केले आहे. 


शहीद भगतसिंग यांचे पंजाबमधील खटकरकालन हे गाव आहे. पंजाबमधील आपच्या यशानंतर भगतसिंग यांच्या खटकरकालन या गावात मुख्यमंत्रीपदाचा शपथग्रहण सोहळा होईल आणि तेथेच भगवंत मान हे पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. दरम्यान, पंजाबमध्ये विजय मिळवल्याबद्दल आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी भगवंत मान यांचे अभिनंदन केले आहे. अरविंद केजरीवाल यांनी भगवंत मान यांना फोन करून त्यांचे आणि पक्षाच्या विजयाचे अभिनंदन केले आहे.


पंजाबमध्ये जवळपास आपचा विजय निश्चित झाला आहे. 117 जागांपैकी 89 जागांवर आप आघाडीवर आहे. विजयानंतर पंजाबमधील आपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार भगवंत मान यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी भगवंत मान यांच्यासोबत त्यांच्या आई देखील उपस्थित होत्या. यावेळी बोलताना भगवंत मान म्हणाले की, "शहीद भगतसिंग यांच्या पंजाबमधील नवानशहर जिल्ह्यातील खटकरकालन या गावी मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा होणार असून खटकरकालन येथेच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. याबरोबरच यापुढे पंजाबमधील कोणत्याही सरकारी कार्यालयात मुख्यमंत्र्यांचा फोटो लावला जाणार नाही तर सरकारी कार्यालयात फक्त भगतसिंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेच फोटो लावण्यात येतील, असेही भगवंत मान यांनी यावेळी सांगितले. 






"तीन कोटी पंजाबच्या जनतेने आमची निवड केली आहे. त्यामुळे यापुढे या तीन कोटी लोकांसाठी काम करायचे आहे. ज्यांनी आपला मतदान केले नाही, त्यांनीही चिंता करण्याचे कारण नाही. कारण मी संपूर्ण पंजाबचा मुख्यमंत्री होणार आहे. आम आदमी पक्षाकडून बंजाबमधील बेरोजगारी दूर करण्यासाठी पहिले पाऊल उचलले जाईल. निवडणुकीच्या दरम्यान माझ्यावर आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर वैयक्तिक आरोप करण्यात आले.  आता आम्ही पंजाबमध्ये रोजगार वाढवण्याचा प्रयत्न करू, पंजाबमध्ये वीज पाणी रस्ते आरोग्य व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे,"  


महत्वाच्या बातम्या