Election Result 2022: देशातील पाच राज्यांमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले आहेत. या पाच राज्यांपैकी चार राज्यांमध्ये भाजप सत्ता स्थापित करताना दिसत आहे. तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party) दमदार एंट्री घेतली आहे. अशातच या पाच ही राज्यांच्या निवडणुकीतील 5 धक्कादायक निकालाबद्दल आम्ही तुम्हाला या बातमीत सांगणार आहोत.  

  


चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) यांना चक्क मोबाईल रिपेअर करणाऱ्याने हरवलं


पंजाब विधानसभा निवडणुकीत दोन जागांवरून निवडणूक लढवणारे पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह यांना दोन्ही जागांवरून पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. भदौर मतदारसंघातून आपच्या लाभ सिंह उगाके यांनी चरणजीत सिंह यांचा पराभव केला आहे. ते फक्त 12 वी पास आहेत. लाभ सिंह उगाके मोबाईल रिपेअरचं काम करतात. तर चमकौर साहिब या मतदार संघातूनही चन्नी यांना परभावाचा सामना करावा लागला आहे. 


उत्तराखंडात माजी मुख्यमंत्री हरीश रावत (Harish Rawat) यांचा पराभव 


उत्तराखंडचे काँग्रेसचे दिग्गच नेते आणि माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांचा पराभव झाला आहे. उत्तराखंडात काँग्रेसने त्यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली असल्याने त्यांचा पराभव धक्कादायक मानला जात आहे. लालकुआ मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मोहन सिंग बिष्ट यांनी 14 हजार मदतनी रावत यांचा प्रभाव केला आहे.    


नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांचा शॉकिंग पराभव 
 
पंजाब काँग्रेचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. अमृतसर पूर्व मतदारसंघातून सिद्धू पराभूत झाले आहेत. नवज्योत सिंग सिद्धू हे पंजाबचे प्रदेशाध्यक्ष आहेत. तसेच ते मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारांमध्येही होते. पण त्यांना आपली जागा गमवावी लागली. अमृतसर पूर्व मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या उमेदवार जीवन ज्योती कौर यांनी त्यांचा पराभव केला आहे. 


शिवसेना-राष्ट्रवादीला (Shiv Sena - NCP) जमलं नाही ते 'आप'ने करून दाखवलं, गोव्यात उघडलं खातं
 
पंजाबसह आम आदमी पक्षाने गोव्यात ही एन्ट्री घेतली आहे. आपली पूर्ण ताकद लावून राज्यात सत्तेत असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना जमलं नाही ते आपने गोव्यात करून दाखवलं आहे. आप पक्षाने गोव्यात दोन जागांवर विजय मिळवला आहे. गोवा विधानसभेत आप पक्षाचे बाणावलीचे उमेदवार व्हिन्सी व्हिएगस यांनी जेष्ठ नेते चर्चिल आलेमाव यांचा पराभव केला आहे. माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांचा पराभब केल्याने व्हिन्सी व्हिएगस जायंट किलर ठरले आहेत. तर वेळळी मतदारसंघात क्रूझ सिल्वा यांनीही माजी मंत्री फिलिप नेरी रॉड्रीग्ज यांचा पराभव केला आहे.


कॅप्टन अमरिंदर सिंह (Captain Amarinder Singh) पराभूत 


काँग्रेसमधून बंडखोरी करुन स्वतंत्र पक्ष काढलेल्या माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला आहे. आपच्या अजीत पाल सिंह यांनी कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा तब्बल 14 हजार मतांनी पराभव केला आहे.


संबंधित बातम्या :