पणजी : गोव्यातील कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता सर्व लोकांना योग्य उपचार मिळावेत यासाठी गोवा सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. गोव्यात आता सर्व खाजगी रुग्णालयांत कोरोनावर मोफत उपचार मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली आहे.
गोवा सरकारने राज्यातील 21 खासगी रुग्णालयात सुरु असलेल्या कोरोनावरील उपचारांचे अधिकार आता आपल्या हातात घेण्याचा निर्णय घेतला आहे. या खासगी रुग्णालयात आता सरकारच्या प्रतिनिधींची नेमणूक करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसात खासगी रुग्णालयांकडून काही नियमांचे उल्लंघन केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे गोवा सरकारने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजन अभावी रुग्णांचा मृत्यू होत असल्याचा विरोधी पक्षांचा आरोप मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी फेटाळला आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यू आणि ऑक्सिजनचा तुटवडा यांचा परस्पर संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
गोव्यात मंगळवारी 26 रुग्णांचा तर बुधवारी 21 रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय. गुरुवारी 13 आणि आता शुक्रवारी पुन्हा आठ रुग्ण ऑक्सिजन अभावी दगावल्याची घटना समोर आली आहे. या घटनांना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाने केली आहे.
सध्या ऑक्सिजन पुरवठा ही गोव्याची सर्वात मोठी चिंता बनली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने त्यावरून सरकारला धारेवर धरलं आहे. याबाबत बोलताना उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने म्हंटल आहे की, आमच्यासमोर जी कागदपत्रे ठेवण्यात आलीत त्यावरून स्पष्ट होतंय की, रुग्ण अक्षरशः तडफडतायत. केवळ ऑक्सिजनच्या अभावामुळे त्यांना प्राण गमवावे लागत आहेत.
महत्वाच्या बातम्या :