नवी दिल्ली : देशात पहिल्या लाटेनंतर सर्व घटकांतील लोक बेजबाबदार वागल्याचा मुद्दा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज  उपस्थित केला. यामुळे सर्वजण सध्या राष्ट्रव्यापी महामारीचा सामना करत आहे. भागवत म्हणाले की, "पहिल्या लाटेनंतर आपण सर्व बेफिकीर झालो. लोक, सरकारे, प्रशासन.. आपल्या सर्वांना हे ठाऊक होते की दुसरी लाट येणार आहे. डॉक्टरांनी आपल्याला इशाराही दिला होता. मात्र, त्यानंतरही आपण निष्काळजीपण करत राहिलो."


मोहन भागवत म्हणाले की, "आता तिसरी लाट येणार असल्याचे सांगितले जात आहे. मग आपण त्याला घाबरायचं का? की विषाणूविरूद्ध लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी योग्य वृत्ती अवलंबली पाहिजे?" आरएसएसने आयोजित केलेल्या 'पॉझिटिव्हिटी अनलिमिटेड' या व्याख्यानमालेत ते बोलत होते. आरएसएसतर्फे लोकांमध्ये आत्मविश्वास व सकारात्मकतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. जेणेकरुन लोकं कोरोना महामारीविरोधात लढू शकतील.


भारत आज मोठ्या संकटात सापडला आहे. मात्र, यातून बाहेर निघण्यासाठी जनता आणि सरकारने सध्याच्या अनुभवांतून शिकून उद्याच्या राष्ट्रासाठी तयारी करायला हवी. देशासमोर आलेल्या अडचणी दूर करण्यासाठी आता सर्वांनी एकत्र लढायला हवे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी भागवत यांनी नागरिकांना प्रोत्साहित केले.


सरसंघचालकांनी आपल्या व्याख्यानात एका उदाहरणाचा उल्लेख केला ते म्हणाले, की ब्रिटिनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्या टेबलावर नेहमी 'सुविचार' लिहिलेला असायचा. त्यामध्ये असे लिहिले आहे की "या कार्यालयात कोणीही निराशावादी नाही. आम्हाला पराभवाच्या शक्यतेत रस नाही. त्याचे अस्तित्व नाही." भागवत म्हणाले की, भारतीयांनाही महामारीवर पूर्ण विजय आवश्यक आहे.