ख्रिसमस-न्यू इयरला प्रवाशांचा खोळंबा, गो-एअरच्या फ्लाइट्स रद्द
डिसेंबर महिनाअखेर म्हणजे फेस्टिव्ह सीजन आणि खास याच काळात कुटुंबासोबत, मित्रमैत्रिणींसोबत लॉंग वेकेशन म्हणीन प्लॅन्स केले जातात. अशात गो एअर या एअरलाइनने आपल्या फ्लाइट्स रद्द केल्या आहेत. ऐनवेळी अशाप्रकारे विमानांची उड्डाणं रद्द झाल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.
मुंबई : डिसेंबर महिना हा फेस्टिव्हल्सचा महिना असतो, मुख्य म्हणजे ख्रिसमस आणि न्यू-इयर सेलिब्रेशन हे सर्वाधिक आकर्षण ठरतं. आता या फेस्टिव्ह सीजनमध्ये सुट्ट्यांची संख्या जास्त असल्याने अनेकजण आपल्या कुटुंबासोबत, मित्रमैत्रिणींसोबत लॉंग वेकेशन ट्रिप प्लॅन करतात. यातच लवकरात लवकर होणारा प्रवास तो म्हणजे विमानाचा प्रवास, त्यामुळे या दिवसांमध्ये विशेषत: डिसेंबर महिन्याच्या अखेरीस प्रवाशांचा जास्त कल हा विमानानं प्रवास करण्याकडे असतो. ख्रिसमस अगदी दोन दिवसावर आला असल्याने प्रवाशांच्या संख्येतही वाढ होत आहे. 23 डिसेंबरपासून देशभरातील गो एअरची 20 पेक्षा जास्त विमानांची उड्डाणं रद्द झाली आहेत, त्यामुळे मुंबई, चेन्नई, दिल्ली, गोवा, कोची आणि पोर्टब्लेअर विमानतळावर प्रवाशांचा खोळंबा पाहायला मिळत आहे. तर आज सकाळी 24 डिसेंबरला मुंबईहून चेन्नई, कोची, बंगळुरू, पोर्टब्लेअर याठिकणी जाणाऱ्या गो एअरची फ्लाइट्ससुद्धा रद्द झाल्या आहेत.
ऑपटेशनरल आणि एअरक्राफ्ट मेन्टेनन्सच्या कामांमुळे ही गो एअरची उड्डाणं रद्द करण्यात आल्याचं एअरलाईनकडून सांगितलं गेलं आहे. 'एअरबस 320 निओ' या विमानांमधील इंजिनमध्ये त्रुटी आढळल्याने गोएअरच्या ताफ्यातील जास्तीत जास्त लाईन एअरक्राफ्ट्स दुरूस्तीसाठी पाठवणं आवश्यक आहे. या विमानांमधील इंजिन बदलण्यासाठी मुदतवाढ देण्यास नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) नकार दिला आहे.
GoAir Flights Cancelled | गो-एअरची 20हून अधिक उड्डाणं रद्द, देशभर प्रवाशांचा खोळंबा | ABP Majha
गो एअरच्याच मुंबई-चंदीगढ विमानातही तांत्रिक बिघाड झाला होता, त्यामुळे आता 'डीजीसीए' मुदतवाढ देण्यास तयार नसल्याची माहिती आहे. त्यामुळे 31 जानेवारीपर्यंत हे काम पूर्ण करण्यास डिजीसीएकडून सांगण्यात आलं आहे. अचानक फ्लाइट्स रद्द झाल्याने गो एअरकडून रिफन्ड जरी दिलं जात असलं तरी प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग ऐनवेळी उपलब्ध नसल्याने प्रवासी आपला संताप व्यक्त करत आहेत. शिवाय ख्रिसमस, नववर्षाच्या स्वागतासाठी अनेकांनी ट्रॅव्हल कंपन्यांचं बुकिंग केलेलं असताना अचानक रद्द झालेल्या फ्लाइट्समुळे ट्रॅव्हल्स कंपन्याकडून पैसे परत देण्याची मागणी प्रवासी करत आहेत. ख्रिसमस आणि न्यू इयर साजरं करण्यासाठी विशेष ट्रिप प्लॅन केलेल्यांना आता ऐनवेळी त्यांचे प्लॅन रद्द करण्याची वेळ आली आहे.