जागतिक उपासमार निर्देशांकात भारताची 107 व्या स्थानी घसरण, पाकिस्तान-बांग्लादेशही भारताच्या पुढे
Global Hunger Index 2022: भारताचे शेजारी देश म्हणजे पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश आणि म्यानमार आणि श्रीलंका हे देश भारताच्या पुढे आहेत.
मुंबई : जागतिक उपासमार निर्देशांक (Global Hunger Index) जाहीर झालेला असून भारताचा या यादीत 121 देशांच्या यादीत 107 वा क्रमांक लागतोय. भारताचा समावेश गंभीर या श्रेणीमध्ये करण्यात आला असून भारतात उपासमारीची समस्या गंभीर असल्याचं त्यामधून सूचित करण्यात आलं आहे. गेल्या वर्षी भारताचा 101 वा क्रमांक होता. आता त्यामध्ये सहा स्थानांची घसरण झाल्याचं दिसून आलं आहे.
यंदाच्या जागतिक उपासमार निर्देशांकमध्ये भारताला 29.1 गुण देण्यात आले आहेत. यामध्ये भारताला गंभीर देशांच्या यादीत स्थान मिळालं आहे. तसेच या यादीत भारताची सहा स्थानांनी घसरण असून भारताचे शेजारी श्रीलंका (64), म्यानमार (71), नेपाळ (81), बांग्लादेश (84) आणि पाकिस्तान (99) हे देश भारताच्या पुढे आहेत. दक्षिण आशियाचा विचार करता भारताच्या मागे फक्त अफगाणिस्तान (109) आहे.
जागतिक उपासमार निर्देशांकातील भारताच्या कामगिरीवरुन विरोधी पक्षांनी केंद्रातल्या सरकारवर चांगलीच टीका केली आहे. त्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केंद्र सरकारच्या वतीनं करण्यात आला आहे.
कसा काढला जातोय जागतिक उपासमार निर्देशांक?
आयर्लंडमधील कन्सर्न वर्ल्डवाईड या संस्थेकडून 2006 सालापासून दरवर्षी जागतिक उपासमार निर्देशांक जाहीर केला जातो. शून्य ते 100 असे गुण या निर्देशांकमध्ये असतात. शून्य गुण म्हणजे त्या देशात उपासमार नसते, तर 100 गुण म्हणजे त्या देशात उसामारीचं संकट मोठं गंभीर असतं.
या निर्देशकाचे मापदंड काय?
तीन मापदंडांच्या आधारे जागतिक उपासमार निर्देशांक जाहीर केला जातो.
1) कुपोषण
2) उंचीच्या तुलनेत वजन आणि वजनाच्या तुलनेत उंची
3) बालमृत्यूदर
जागतिक उपासमार निर्देशांकामध्ये शून्य ते 9 गुण असतील तर त्या देशामध्ये उपासमारीची समस्या ही कमी असते. तर 10 ते 19.9 गुण असतील तर त्या देशातील उपासमार ही मध्यम अशी असते. 20 ते 34.9 गुण असतील तर त्या देशात उपासमारीचे संकट गंभीर असल्याचं मानलं जातं. 35 ते 49.9 दरम्यान गुण असतील तर चिंताजनक आणि 50 च्या वरती गुण असतील तर अतिशय चिंताजनक स्थिती असल्याचं समजलं जातं.