बनावट एके-47 चा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या टोळीला अटक
बनावट एके-47 चा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. दहशतवादी असल्याचे सांगत या टोळीने दीड लाखांची रोकड लुटली होती.
श्रीनगर: दहशतवादी असल्याचे सांगत खोट्या शस्त्रांचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी मध्य काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात ही कारवाई करत तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी आरोपींकडून मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम, दागिने आणि खोटी शस्त्रे जप्त केली आहेत.
बडगाम जिल्ह्याचे एसएसपी ताहिर सलीम यांनी सांगितले की, २३ ऑगस्ट रोजी बीरवाह ठाण्यातील एका संस्थेच्या केंद्र संचालकाने तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार, काही काही शस्त्रधारी मंडळींनी त्याला बंदूकीचा धाक दाखवून मारहाण केली आणि त्याच्याकडील 1,50, 000 रुपयांची रोकड लुटली.
या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी विविध पुराव्यांच्या आधारे काम करत आरोपींचा माग घेण्यास सुरुवात केली. पोलिसांना पेथजानिगाममधील फिरोज अहमद वाणी याच्यावर संशय आला.
पोलिसांनी या संशयिताची वारंवार चौकशी केली. अखेर पोलिसांच्या चौकशीत त्याने लूटमार केली असल्याचे मान्य केले. वाणीने लूटमारीत सामील असलेल्या आपल्या इतर दोन सहकाऱ्यांची नावे सांगितली. त्यानंतर पोलिसांनी आसिफ अहमद अहंगेर आणि बिलाल अहमद मलिक या दोन आरोपींना अटक केली.
बनावट एके-47 जप्त
पोलिसांनी या तिन्ही आरोपींची कसून चौकशी केली. आरोपी आसिफ अहमद अहंगेर याच्या बागेत असणाऱ्या शेडमधून लूटमारीसाठी वापरण्यात आलेल्या वस्तू जप्त करण्यात आल्या. पोलिसांनी एक बनावट एके-47, चेहरा झाकण्यासाठी वापरण्यात आलेला कपड्याचा तुकडा आणि 33 हजार रुपयांची रोकड जप्त केली.
बनावट शस्त्र पेठ-जानिगाममधील एका व्यक्तीने तयार केले असल्याची माहिती समोर आली. त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.
दहशतवादी असल्याचे सांगत याआधीदेखील लूटमारीच्या घटना घडल्या आहेत. मागील वर्षी पोलिसांनी श्रीनगरमधून अशाच एका टोळीला अटक केली होती. ही टोळी विवाह सोहळ्याच्या ठिकाणी दरोडा टाकून रोक रक्कम, दागिने लूटत असे.