Free Corona Booster Dose : देशभरात आजपासून 'कोविड लस अमृत महोत्सव'; पुढील 75 दिवसांसाठी 'मोफत बूस्टर डोस'
Free Corona Booster Dose : देशभरात आजपासून 'कोविड लस अमृत महोत्सव' राबवण्यात येणार आहे. आजपासून पुढचे 75 दिवस देशभरात मोफत बुस्टर डोस देण्यात येणार आहे.
Free Corona Booster Dose : तब्बल दोन वर्षांहून अधिक काळ संपूर्ण जग कोरोनाशी (Covid-19) लढा देत आहे. तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव मात्र अद्याप कमी झालेला नाही. देशात पुन्हा एकदा कोरोनाचा चढता आलेख दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं कोरोना लसीकरणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. देशातील 18 वर्षांवरील नागरिकांसाठी 'बूस्टर डोस' (Booster Dose) मोफत देण्याची घोषणा केली आहे. देशात 75 दिवसांसाठी 'कोविड लस अमृत महोत्सव' राबवण्यात येणार आहे. या 75 दिवसांत 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत बूस्टर डोस दिला जाणार आहे.
दोन लसींमधील अंतर 9 महिन्यांवरुन 6 महिन्यांवर
आरोग्य मंत्रालयां कोरोनाचा दुसरा डोस आणि बूस्टर डोस यांच्यातील अंतर 9 महिन्यांवरुन 6 महिन्यांवर आणलं आहे. जास्तीत जास्त लोकांनी बुस्टर डोस घ्यावा, या हेतूनं हे अंतर कमी करण्यात आलं आहे. यासोबतच केंद्र सरकारनं प्रत्येक व्यक्तीचं लसीकरण करण्यासाठी 1 जूनपासून 'हर घर दस्तक' मोहीम 2.0 सुरु केली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांच्या अभ्यासानुसार, कोरोनाच्या पहिल्या दोन डोसचा प्रभाव फक्त 6 महिने टिकतो. यानंतर व्यक्तीच्या शरीरातील अँटीबॉडीची पातळी कमी होते. अशा परिस्थितीत बूस्टर डोस घेणं आवश्यक आहे जेणेकरून रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल.
केंद्र सरकारची मोफत बुस्टर डोसची मोहीम केवळ 75 दिवस चालणार असल्याची माहिती समोर आली आहे. बूस्टर डोस मिळविण्यासाठी लोकांना सर्वात आधी कोविड पोर्टलवर बूस्टरसाठी बुकिंग करावं लागणार आहे. बुकिंगशिवायही लस घेता येणार आहे. तुम्ही लसीकरण केंद्रात जाऊन थेट बूस्टर डोस घेऊ शकता.
कधी घ्यावा बूस्टर डोस?
ज्या व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस पूर्ण केले आहेत आणि त्यांना दोन्ही डोस घेऊन सहा महिने किंवा त्याहून अधिक काळ लोटला असेल त्या व्यक्ती बूस्टर डोस घेऊ शकतात. त्यासाठी त्यांना जवळच्या खाजगी लसीकरण केंद्रावर बूस्टर डोससाठी नोंदणी करु शकतात.
खासगी रुग्णालयात आकारलं जाणार 225 रुपये शुल्क
कोरोनाचा बूस्टर डोस फक्त सरकारी हॉस्पिटलमध्येच मोफत मिळणार आहे. खासगी रुग्णालयात कोणी बूस्टर डोस घेतल्यास त्यासाठी त्यांना शुल्क भरावं लागणार आहे. खाजगी केंद्रांवर, कोविशील्ड आणि कोवॅक्सीनच्या बूस्टर डोससाठी 225 रुपये शुल्क भरावं लागणार आहे. याशिवाय रुग्णालय स्वतंत्रपणे सेवा शुल्क देखील आकारू शकते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :