सीरम इन्स्टिट्युटचे अदर पूनावाला, WHO सह अनेकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे प्रकरण?
सीरम इन्स्टिट्युटची कोविशील्ड लस घेतल्यानंतरही मानवधिकार कार्यकर्ते प्रताप चंद्र यांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्या नाहीत. उलट शरीरातील प्लेटलेट्स निम्म्या कमी झाल्या.
लखनौ : कोविशील्ड लस मिळाल्यानंतरही अँटीबॉडीज तयार न झाल्याबद्दल मानवाधिकार कार्यकर्ते प्रताप चंद्र यांनी शनिवारी एसीजेएम -5 दंडाधिकारी शांतनु त्यागी यांच्या न्यायालयात 156-3 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे मालक अदर पूनावाला, ड्रग कन्ट्रोल डायरेक्टर, ICMR, आरोग्य सचिव आणि WHO विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्रताप चंद्राने 30 मे रोजी अशियाना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र गुन्हा दाखल न झाल्याने लखनौचे पोलीस आयुक्त आणि पोलिस महासंचालक यांना तक्रार पाठवून गुन्हा नोंदवण्याची विनंती केली. मात्र शेवटी त्यांना न्यायालयात जाऊन गुन्हा दाखल करण्यास भाग पाडावे लागले.
प्रताप चंद्र याचं नेमक म्हणणं काय?
कोविशील्ड लस सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाने तयार केलेली आहे. या लसीला ICMR, आरोग्य मंत्रालय, राष्ट्रीय आरोग्य मिशनाद्वारे मान्यताप्राप्त आणि विविध वृत्तपत्र मासिकांनी दूरदर्शनद्वारे लसी घेण्यासाठी प्रोत्साहित केलं गेले. त्यानुसार मी 8 एप्रिल 2021 रोजी गोविंद हॉस्पिटल, आशियाना पोलिस स्टेशन, रुचि खंड येथे लसीचा पहिला डोस घेतला. दुसर्या डोसची निर्धारित तारीख 28 दिवसांनंतर देण्यात आली होती. परंतु 28 दिवसांनंतर गेल्यावर मला सांगण्यात आले की आता दुसरा डोस 6 आठवड्यांनंतर दिला जाईल. त्यानंतर सरकारने जाहीर केले की आता दुसरा डोस 6 नव्हे तर 12 आठवड्यांनंतर दिला जाईल.
लस घेतल्यानंतर माझी तब्येत ठीक नव्हती आणि 21 मे 2021 रोजी आयसीएमआर आणि आरोग्य मंत्रालयाची पत्रकार परिषद टीव्ही वाहिन्यांवरून पाहिली. आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी म्हटलं की, कोविशील्ड लसीच्या पहिल्या डोसनंतर शरीरात अँटीबॉडीज तयार होतात. हेच तपासण्यासाठी मी 21 मे 2021 रोजी सरकारमान्य लॅब थाररोकेअर मध्ये COVID Antibody GT चाचणी केली. मात्र 27 मे रोजी माझा रिपोर्ड निगेटिव्ह आला. म्हणजेच माझ्या शरीरात अँटिबॉडिज तयार झाल्या नाहीत. उलट माझ्या शरीरातील प्लेटलेट्स 3 लाखांवरून 1.5 लाखांपर्यंत कमी झाल्या.त्यामुळे मला फक्त फसवलेच तर माझ्या जीवालादेखील मोठा धोका निर्माण झाला आहे, असं प्रताप चंद्र यांनी म्हटलं.
आयसीएमआर, आरोग्य विभागाने सांगितल्याप्रमाणे लस घेतल्यानंतर अँटीबॉडीज तयार होतात, कमी किंवा जास्त प्रमाणात. मात्र माझा रिपोर्टच निगेटिव्ह आला. शिवाय प्लेटलेट्स देखील अर्ध्यापेक्षा कमी झाल्या. ज्यामुळे माझा मृत्यू देखील होऊ शकतो. ही माझी पूर्णपणे फसवणूक आहे आणि हा मी माझ्या हत्येच्या प्रयत्न मानतो, असं प्रताप चंद्र यांनी म्हटलं.
एक विश्वस्त कंपनी, संस्था, पदाधिकारी यांनी केलेली फसवणूक आहे. कारण आतापर्यंत सरकारच्या जबाबदार संस्थांनी लस दिल्यानंतर अँटीबॉडीज तयार झाल्या नाही तर काय होईल, हे सांगितले नाही. त्यामुळे लस घेऊनही असं झालं तर ही व्यक्ती समाजासाठी एक धोका आहे. हे अस झालं अपघाताच्या ऐनवेळी गाडीची एअरबॅग न उघडणे किंवा बनावट औषध घेतल्याने धोक्यात येण्यासारखे आहे.