एका स्कूटरवर आम्ही चार जण, तरुणपणी मीही मोडले नियम: नितीन गडकरी
Nitin Gadkari On Road Safety: रस्ते सुरक्षेवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपलं मतं व्यक्त करत रस्ते अपघातांबाबत चिंता व्यक्त केली आहे. गडकरींनी कारमधील सेफ्टी फीचर्सबद्दलही आपलं मत व्यक्त केलं आहे.
Nitin Gadkari On Road Safety: रस्ते सुरक्षेवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपलं मतं व्यक्त करत रस्ते अपघातांबाबत चिंता व्यक्त केली आहे. गडकरींनी कारमधील सेफ्टी फीचर्सबद्दलही आपलं मत व्यक्त केलं आहे. भारतात सहा एअरबॅग असणारी वाहने बाजारात आणण्याचे काम सुरू असल्याचे गडकरी म्हणाले आहेत. याशिवाय सीटबेल्ट न लावणे हे चुकीचे असल्याचं गडकरी म्हणाले आहेत.
रविवारी सायरस मिस्त्री यांचं अहमदाबाद-मुंबई महामार्गावर कार अपघातात निधन झालं. याबाबत आज तकशी संवाद साधता ते म्हणाले आहेत की, अहमदाबाद-मुंबई महामार्ग अत्यंत धोकादायक आहे. तिथे ट्रॅफिक PCU 1.20 लाख आहे, जे खूप आहे. ते 20 हजार पीसीयूपर्यंत खाली आणावे लागेल. ते पुढे म्हणाले की, 2024 पर्यंत सरकारला रस्ते अपघात 50 टक्क्यांनी कमी करायचे आहेत. रस्ते अपघात कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांचे पालन केले जाईल, असे ते म्हणाले.
गडकरी म्हणाले की, 'कार कंपन्या इतर देशांना वाहने निर्यात करतात, तेव्हा ते आपल्या कारमध्ये सहा एअरबॅग्ज देतात. मात्र भारतात ते फक्त चार एअरबॅग्ज असलेल्या कारची विक्री करतात.' यावेळी सहा एअरबॅग्ज बसवल्यास कारची किंमत 50-60 हजार रुपयांनी वाढू शकते, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले की, हे चुकीचे आहे. जर मोठ्या प्रमाणात उत्पादन असेल तर एका एअरबॅगची किंमत फक्त 900 रुपये असेल.
भारतात अनेक लोक कारच्या मागच्या सीटवर बसताना सीटबेल्ट घालत नाही. सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांच्याबाबतही असाच प्रकार घडला असल्याचं बोललं जात आहे. याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, सीटबेल्ट हे मागच्या बाजूला बसलेल्या लोकांसाठी जेवढे महत्त्वाचे आहे तेवढेच ते समोर बसलेल्या लोकांसाठीही आहेत. त्यांचा एक जुना किस्सा सांगताना गडकरी म्हणाले की, मी काही काळापूर्वी चार मुख्यमंत्र्यांच्या वाहनात बसलो होतो. या सर्वांच्या वाहनांच्या पुढील सीटवर सीटबेल्टच्या सॉकेटवर क्लिप होती. चेतावणी अलार्म वाजू नये म्हणून असं करण्यात आलं होतं. त्यामुळे मी ड्रायव्हरला खडसावले आणि क्लिप काढायला लावली.
सांगितला तरुणपणीचा किस्सा
यावेळी बोलताना नितीन गडकरींनी आपल्या तरुणपणीचा एक किस्सा देखील सांगितला. ते म्हणाले की, तरुणपणी ते स्वतः नियम मोडायचे. हे किती धोकादायक ठरू शकते, याची त्यांना जाणीव नव्हती. आपल्या कॉलेजच्या दिवसांचा एक किस्सा सांगताना गडकरी म्हणाले की, निवडणुकीच्या वेळी ते स्कूटरवरून चार जण फिरत असत आणि दंड होऊ नये म्हणून नंबर प्लेट हाताने लपवत असत. पण आता लोकांची मानसिकता बदलावी लागेल, नियम पाळावे लागतील, असे गडकरी म्हणाले.