Pandit Sukh Ram: देशातील मोबाईल क्रांतीचा जनक काळाच्या पडद्याआड; घोटाळ्यामुळे कारकीर्द नेहमीच राहिली चर्चेत
Who is Pandit Sukh Ram: भारतातील मोबाइल क्रांतीचा पाया रचण्याचे श्रेय पंडित सुखराम यांना जाते. त्यांनी भारतात मोबाइल सेवा सुरू केली होती.
Pandit Sukh Ram Sharma: माजी केंद्रीय मंत्री पंडित सुखराम शर्मा यांचे आज निधन झाले. पंडित सुखराम हे घोटाळ्यामुळे चर्चेत राहिले होते. मात्र, भारतात मोबाइल क्रांतीचा पाया रचण्याचे काम पंडित सुखराम यांनी केले होते. भारतात सध्या किमान प्रत्येक घरात एक तरी मोबाइलधारक दिसतो. याचे श्रेय पंडित सुखराम यांना जाते. भारतात पहिला मोबाइल कॉलदेखील त्यांनी केला होता.
माजी केंद्रीय मंत्री पंडित सुखराम हे 94 वर्षांचे होते. त्यांना सोमवारी हृदयविकाराचा झटका आला होता. तेव्हापासूनच त्यांची प्रकृती नाजूक होती. वर्ष 1996 मध्ये पंडित सुखराम यांच्या घरी सीबीआयने धाड टाकत जवळपास चार कोटींची रोकड जमा केली होती. त्यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक चढ-उतार आले.
जपानमधून भारतात आला मोबाइल फोन
पंडित सुखराम यांनी भारतात मोबाइल सेवा सुरू करण्याचा किस्साही रंजक आहे. पंडित सुखराम हे दूरसंचार मंत्री असताना जपानच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी कार चालकाच्या खिशात मोबाइल फोन पाहिला होता. जपानमध्ये असे तंत्रज्ञान असू शकतं मग, भारतात का नाही? असा विचार त्यांनी केला. त्यानंतर भारतात मोबाइल फोन सेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. एका जाहीर सभेतही त्यांनी येणाऱ्या काही वर्षात तुमच्या खिशात मोबाइल फोन असेल असे म्हटले. त्यावेळी लोकांनी या वक्तव्याला हसण्यावारी नेले होते. साधा लँडलाइन फोनसाठीदेखील त्यावेळी लोकांना काही महिने प्रतिक्षा करावी लागायची. त्यामुळे मोबाइल फोन कुठून येणार, अशी लोकांनी उपस्थित केलेली शंका योग्यच होती.
भारतातील पहिला मोबाइल कॉल
पंडित सुखराम हे 1993 ते 1996 या काळात दूरसंचार मंत्री होते. भारतात 31 जुलै 1995 रोजी पहिल्यांदा मोबाइल फोनमधून कॉल करण्यात आला होता. हा पहिला मोबाइल कॉल तत्कालीन केंद्रीय दूरसंचार मंत्री सुखराम आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांच्या दरम्यान झाला होता. यासाठी नोकिया कंपनीचा हँडसेट वापरण्यात आला होता. त्यानंतर भारतात टेलिकॉम क्षेत्र विस्तार गेले.
धीरुभाई अंबानी यांच्याशी झाली होती चर्चा
एका मुलाखतीत सुखराम यांनी सांगितले की, आपल्या या मोबाइलच्या व्हिजनबाबत त्यांनी रिलायन्स उद्योग समूहाचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांच्यासोबत चर्चा केली होती. एक दिवस मोबाइल टेलिफोन क्षेत्रात मोठा फायदा होईल असेही त्यांनी सांगितले होते. मोबाइल फोनमध्ये कॅमेरादेखील बसवला जाऊ शकतो, असा विचारही आपण कधी केला नव्हता असेही सुखराम यांनी एका मुलाखतीत म्हटले होते.
सीबीआयचा छापा
देशात पी. व्ही. नरसिंह राव यांचे सरकार असताना दूरसंचार मंत्री सुखराम यांच्या दिल्ली आणि हिमाचल प्रदेशमधील मंडी येथील घरावर सीबीआयचा छापा पडला. त्यावेळी सीबीआयला त्यांच्या घरातून नोटांनी भरलेले सूटकेस, बॅग आढळून आली. त्यावेळी जवळपास 4 कोटी रुपये सापडले. एवढे पैसे कुठून आले, याचे उत्तर त्यांना देता आले नाही. बेकायदेशीरपणे खासगी कंपनीला फायदा मिळवून देण्याच्या मोबदल्यात त्यांना ही रक्कम मिळाली असल्याचे म्हटले जाते. या छाप्यामागेदेखील काँग्रेसच्या काही नेत्यांचा हात असल्याचे म्हटले जाते. सीबीआयने अटक केल्यानंतर सुखराम यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर काँग्रेसने त्यांना पक्षातून बाहेर काढले. वर्ष 2002 मध्ये त्यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. मंत्रीपदाचा दुरुपयोग करत त्यांनी एका खासगी कंपनीला कच्चा माल पुरवठा करण्याचे कंत्राट दिले. मात्र, यामुळे सरकारला 1.66 कोटींचे नुकसान झाले.
1963 मध्ये हिमाचल प्रदेशमधून राजकीय कारकीर्दीला सुरुवात करणारे सुखराम 1996 मध्ये या भ्रष्टाचाराच्या आरोपाने बदनाम झाले. त्यांनी केलेल्या मोबाइल क्रांतीपेक्षा त्यांचा घोटाळा लोकांच्या कायम लक्षात राहिला.
राजकीय प्रवास
हिमाचल प्रदेशमधून त्यांनी आपला राजकीय प्रवास सुरू केला. त्यांनी पाच वेळेस विधानसभा आणि तीन वेळेस लोकसभा निवडणूक लढवली होती. वर्ष 1963 ते 1984 या काळात ते आमदार होते. 1984 मध्ये लोकसभेवर निवडून आले आणि राजीव गांधी सरकारमध्ये राज्यमंत्री झाले. 1996 मध्ये मंडीतून पुन्हा विजयी झाले आणि दूरसंचार मंत्री झाले.
काँग्रेसने पक्षातून काढल्यानंतर 1997 मध्ये हिमाचल विकास काँग्रेसची स्थापना केली आणि 1998 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत युती करून सरकारमध्ये सामील झाले. सुखराम यांच्यासह त्यांचे पाच आमदार मंत्री झाले. त्यांचा मुलगा अनिल शर्मा 1998 मध्ये राज्यसभेवर निवडून आला होता. वर्ष 2003 मध्ये मंडीतून सुखराम पुन्हा विजयी झाले आणि यावेळी त्यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली. वर्ष 2017 मध्ये सुखराम यांनी आपल्या मुलासह भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु दोन वर्षांत त्यांनी काँग्रेसमध्ये 'घर वापसी' केली. सुखराम यांचा मुलगा अनिल शर्मा हा मंडीतून भाजपचा आमदार आहे.