Crime News: नवऱ्याचा स्पर्म काऊंट कमी; सुनेला गर्भवती करण्यासाठी सासऱ्यासह नणंदेच्या पतीकडून वारंवार अत्याचार, ती गर्भवतीही राहिली, नंतर....
Crime News: गुजरातमधील वडोदरा येथील एका 40 वर्षीय महिलेने तिच्या सासऱ्यावर आणि नणंदेच्या पतीवर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. महिलेच्या पतीच्या शुक्राणूंची संख्या कमी असल्याने तिला गर्भवती करण्यासाठी तिच्यावरती अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे.

वडोदरा: गुजरातमधील वडोदरा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 40 वर्षीय महिलेने तिच्या सासऱ्यावर आणि नणंदेच्या पतीवर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. महिलेच्या पतीच्या शुक्राणूंची संख्या कमी असल्याने तिला गर्भवती करण्यासाठी हे करण्यात आल्याचा आरोप आहे. गर्भपात झाल्यानंतर महिलेने नवपुरा पोलिस ठाण्यात याबाबत एफआयआर दाखल केला आहे. तिने तिच्या सासऱ्यावरती आणि नणंदेच्या पतीवर बलात्कार आणि लैंगिक छळाचा आरोप केला आहे. महिलेने तिच्या पतीवर तिच्या खाजगी क्षणांचे फोटो सार्वजनिक करण्याची धमकी देऊन तिला गप्प राहण्यासाठी ब्लॅकमेल केल्याचा आरोपही केला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पीडितेने सांगितले की तिचे लग्न फेब्रुवारी 2024 मध्ये झाले होते. लग्नानंतर ती तिच्या पतीच्या घरी राहायला गेली. काही आठवडे राहिल्यानंतर, तिच्या सासरच्यांनी तिला सांगितले की तिच्या वयामुळे ती गर्भवती राहू शकणार नाही. त्यांनी तिला आणि तिच्या पतीला गर्भधारणेसाठी उपचार घेण्याचा सल्ला दिला. वैद्यकीय अहवालात असे दिसून आले की तिच्या पतीमध्ये शुक्राणूंची संख्या ( Low Sperm Count) खूपच कमी होती. यामुळे ती गर्भवती राहू शकणार नव्हती.
मूल दत्तक घेण्याचा सल्ला दिला
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार महिलेने इन व्हिट्रो फर्टिलायझेशन (IVF) केले, परंतु ते यशस्वी झाले नाही. त्यानंतर, तिने पुढील उपचार घेण्यास नकार दिला आणि मूल दत्तक घेण्याचा सल्ला दिला, परंतु तिच्या सासरच्या लोकांनी ते मान्य केले नाही.
सासरच्यांनी तिच्यावर केला बलात्कार
तिने तक्रारीत म्हटले आहे की, जुलै 2024 मध्ये, ती तिच्या खोलीत झोपली असताना, तिचे सासरे आत आले आणि तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. जेव्हा तिने मदतीसाठी ओरड केली तेव्हा त्यांनी तिला चापट मारली. जेव्हा तिने तिच्या पतीला याबद्दल सांगितले तेव्हा त्याने सांगितले की त्याला मूल हवे आहे आणि बलात्काराबद्दल तिला गप्प राहण्यास सांगितले. त्याने असेही सांगितले की जर तिने बलात्काराबद्दल कोणाला सांगितले तर तो तिचे नग्न फोटो व्हायरल करेल. पीडितेने सांगितले की, तिच्या सासऱ्याने तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला, परंतु ती गर्भवती राहिली नाही.
नणंदेच्या पतीनेही तिच्यावर बलात्कार केला
तक्रारीत म्हटले आहे की डिसेंबर 2024 मध्ये तिच्या नणंदेच्या पतीनेही तिच्यावर बलात्कार केला. त्यानेही अनेक वेळा हा गुन्हा केल्याचा आरोप आहे. तक्रारदार जूनमध्ये गर्भवती राहिली, परंतु जुलैमध्ये तिचा गर्भपात झाला. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात तिने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी प्राथमिक तपास केला आणि रविवारी एफआयआर नोंदवला.
























