(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Court On Extra Marital Affairs: जोडीदारावर विवाहबाह्य संबंधांचा आरोप लावणे क्रूरता, हायकोर्टाने पत्नीची घटस्फोटविरोधातील याचिका फेटाळली
Court On Extra Marital Affairs: जोडीदारावर विवाहबाह्य संबंधांचा आरोप करणे ही क्रूरताच असल्याचे अहमदाबाद हायकोर्टाने एका प्रकरणात म्हटले आहे.
Court On Extra Marital Affairs: एखादी पत्नी आपल्या पतीवर विवाहबाह्य संबंधांचा ( Extramarital Affair) आरोप करत असेल तर, हीदेखील क्रूरता असल्याचा निर्वाळा हायकोर्टाने (High Court) दिला आहे. कौटुंबिक न्यायालयाने (Family Court) पतीचा घटस्फोट अर्ज मंजूर केला. त्यानंतर पत्नीने या निकालाविरोधात धाव घेतली होती. या याचिकेवर सुनावणी करताना अहमदाबाद हायकोर्टाने ( Ahmedabad High Court ) पत्नीला फटकारत याचिका फेटाळून लावली.
गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यातील प्रांतिज तालुक्यातील एका शाळेतील शिक्षकाने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. या जोडप्याचा वर्ष 1993 मध्ये विवाह झाला होता. दोघांना 2006 मध्ये मुलगा झाला. मुलाच्या जन्मानंतर पतीने 2009 मध्ये गांधीनगरमध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला होता. पतीने आपल्या पत्नीवर विवाहबाह्य संबंध आणि क्रूरपणाने वागत असल्याचा आरोप केला. पत्नीने 2006 मध्ये घर सोडले आणि मुलासोबत परतलीच नाही, असे त्याने कोर्टात सांगितले होते.
पतीने सांगितले की, पत्नीने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार, त्याचे एका महिला सहकारीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप पत्नीने केला होता. त्याशिवाय इतरही आरोप होते. मात्र, कौटुंबिक न्यायालयाने पतीला निर्दोष ठरवले. त्याशिवाय घरगुती हिंसाचार प्रतिबंध कायद्यानुसार, दाखल केलेली तक्रारदेखील फेटाळून लावली.
कौटुंबिक न्यायालयाने 2014 मध्ये पतीने दाखल केलेली घटस्फोट याचिका मंजूर केली. त्यानंतर विभक्त राहणाऱ्या पत्नीने या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिले. पतीनेच आपल्याला सोडून दिल्याचा आरोप पत्नीने केला. पत्नीने स्वतः हून घर सोडले आणि जेव्हा तिने घटस्फोटासाठी अर्ज केला तेव्हा ती परत आली असल्याचे पतीने म्हटले. घरी परतलेल्या पत्नीने मला आणि माझ्या वृद्ध आईला वाईट वागणूक दिली असल्याचे पतीने म्हटले. तिच्याकडून होणाऱ्या मानसिक त्रासामुळे वडिलोपार्जित घर सोडून गांधीनगरमध्ये राहण्यास भाग पाडले असल्याचा आरोप पतीने केला.
पती आणि त्याची आई ही स्वत: च्या घरात राहत नसल्याची बाब कोर्टासमोर आली. घटस्फोट झाल्यानंतरही महिला पतीच्या वडिलोपार्जित घरी राहत असल्याचे दिसून आले. महिलेचा हा व्यवहार तिची भूमिका स्पष्ट करणारी असल्याचे दिसत असल्याचे कोर्टाने म्हटले. हायकोर्टाने म्हटले की, पती अथवा पत्नीवर विवाहबाह्य संबंधाचे आरोप लावणे ही क्रूरता आहे. या प्रकरणात पत्नीने पतीवर लावलेल्या आरोपामुळे त्याला नैराश्य, तणाव, मानसिक त्रास होणे स्वाभाविक असल्याचे अहमदाबाद हायकोर्टाने म्हटले.