सुकेश चंद्रशेखर प्रकरणी नोरा फतेहीच्या अडचणींत वाढ, EOW कडून तब्बल 6 तास चौकशी
EOW Questioned Nora Fatehi : अभिनेत्री नोरा फतेहीच्या अडचणी वाढत आहेत. सुकेश चंद्रशेखर फसवणूक प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) शुक्रवारी अभिनेत्रीची सुमारे 6 तास चौकशी केली आहे.
EOW Questioned Nora Fatehi : सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandra Shekhar Case) प्रकरणात अनेक बॉलिवूड अभिनेत्री रडारवर असून अनेक अभिनेत्रींच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. काल (शुक्रवारी) अभिनेत्री नोरा फतेहीची (Nora Fatehi) दिल्ली आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली आहे. सुकेश चंद्रशेखर आर्थिक घोटाळ्याप्रकरणी नोराची चौकशी करण्यात आली. एक नाही, दोन नाही, तर तब्बल सहा तास नोरा फतेहीची चौकशी सुरु होती. दरम्यान, यापूर्वी याप्रकरणात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचीही चौकशी करण्यात आली होती.
सुकेश चंद्रशेखर प्रकरणी अभिनेत्री नोरा फतेहीला काल (शुक्रवारी) चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. काल सकाळी 11 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत नोराची याप्रकरणी चौकशी सुरु होती. आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी नोराचा जबाब नोंदवून घेतला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गरज पडल्यास नोरा फतेहीला पुन्हा एकदा चौकशीला बोलावलं जाऊ शकतं.
प्रकरण नेमकं काय?
200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या सुकेश चंद्रशेखर (Sukesh ChandraShekhar) सोबत बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचं नाव (Jacqueline Fernandez) जोडले जात होते. त्यानंतर जॅकलिन आणि सुकेशचा एक फोटोदेखील व्हायरल झाला होता. पण आता याप्रकरणात आणखी काही अभिनेत्रींचा सहभाग असल्याचं समोर आले आहे.
सुकेश चंद्रशेखरने पिंकी इराणीच्या माध्यमातून भूमी पेडणेकर (bhumi Pednekar), सारा अली खान (Sara Ali Khan) आणि जान्हवी कपूर (Jhanvi Kapoor) सारख्या काही अभिनेत्रींवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला असल्याचे ईडीच्या तपासात उघड झालं आहे. सुकेशने या अभिनेत्रींना महागड्या भेटवस्तू पाठवल्या आहेत. काही अभिनेत्रींनी या भेटवस्तूंचा स्वीकार केला तर काहींनी नाकारल्या होत्या.
महागडी घड्याळं, जनावरं अन् बरंच काही
याप्रकरणात सर्वात आधी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचं नाव आलं होतं. त्यानंतर याप्रकरणात आणखी काही अभिनेत्रींचा सहभाग असल्याचं समोर आलं. सुकेश चंद्रशेखर या उद्योगपतीनं एकूण 5 जनावरं जॅकलिनला गिफ्ट म्हणून दिल्याचं समोर आलं होतं. त्यातल्या अरबी घोड्याची किंमत तब्बल 52 लाख आणि प्रत्येकी 9 लाख रुपये किंमत असलेल्या एकूण 36 लाखांच्या 4 पर्शियन मांजरांचाही समावेश होता. ही सर्व माहिती ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रात देण्यात आली होती. पण आता जॅकलीनसह आणखी काही अभिनेत्रींनादेखील महागड्या भेटवस्तू दिल्याचं समोर आलं आहे.