Rajya Sabha Election | राज्यसभेच्या 55 जागांसाठी 26 मार्च रोजी मतदान
17 राज्यांमधील राज्यसभेच्या 55 जागांसाठी येत्या 26 मार्च निवडणूक घेण्यात येणार आहे, अशी घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली. यंदा महाराष्ट्रातील जे सात सदस्य निवृत्त होत आहेत.
नवी दिल्ली : येत्या एप्रिल महिन्यात राज्यसभेच्या 55 जागा रिक्त होत आहे. या जागांसाठी 26 मार्च रोजी निवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (25 फेब्रुवारी) याबाबत घोषणा केली. या 55 जागांपैकी सर्वाधिक सात जागा महाराष्ट्रातील आहे. 17 राज्यांमधील राज्यसभेच्या 55 सदस्यांसाठी निवडणूक 26 मार्च रोजी घेण्यात येणार आहे, असं केंद्रीय निवडणूक आयोगाने सांगितलं.
राज्यसभेतील 55 खासदार एप्रिल महिन्यात निवृत्त होत आहेत. हे खासदार भाजप, काँग्रेससह अनेक पक्षांचे आहेत. सध्या राज्यसभेत 245 खासदार आहेत. रिक्त होणाऱ्या राज्यासभेच्या जागांमध्ये सर्वाधिक महाराष्ट्रातील आहेत. त्याखालोखाल तामिळनाडूतील सहा, पश्चिम बंगाल आणि बिहारमधील प्रत्येकी पाच जागा रिक्त होत आहेत. यंदा महाराष्ट्रातील जे सात सदस्य निवृत्त होत आहेत, त्यामध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार, माजिद मेमन, काँग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत, भाजपचे रामदास आठवले, अमर साबळे, संजय काकडे यांचा समावेश आहे.
राज्यसभेच्या सात जागांसाठी लवकरच निवडणूक; कुणाची वर्णी लागणार, कुणाला डावललं जाणार?
कोणत्या राज्यात किती जागा? महाराष्ट्र - 7 ओदिशा - 4 तामिळनाडू - 6 पश्चिम बंगाल - 5 आंध्र प्रदेश - 4 तेलंगणा - 2 आसाम - 3 बिहार - 5 छत्तीसगड - 2 गुजरात - 4 हरियाणा - 2 हिमाचल प्रदेश - 1 झारखंड -2 मध्य प्रदेश 3 मणिपूर - 1 राजस्थान - 3 मेघालय - 1
अशी असेल निवडणूक प्रक्रिया! उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख - शुक्रवार, 13 मार्च 2020 उमेदवारी अर्ज पडताळण्याची अंतिम तारीख - सोमवार, 16 मार्च 2020 उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख - बुधवार, 18 मार्च 2020 निवडणुकीची तारीख - गुरुवार, 26 मार्च 2020 मतदानाची वेळ - सकाळी 9 पासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतमोजणीची तारीख आणि वेळ - 26 मार्च 2020, दुपारी 5 वाजता
राज्यसभेतील खासदार कसे निवडले जातात? राज्यसभा संसदेचं वरिष्ठ सभागृह आहे. राज्यसभेत 250 सभासद असतात. त्यापैकी 12 सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. यामध्ये कला, साहित्य, विज्ञान आणि समाजसेवा यांसारख्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश असता. तर उर्वरित 238 सभासदांची निवड राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील विधीमंडळ आमदार करतात.
राज्यसभा खासदारांची निवड थेट जनतेतून नाही तर विधानसभेवर निवडून गेलेले आमदार करतात. प्रत्येक राज्याला जागांची संख्या ठरवून दिलेली असते. त्या जागांसाठी कोणता खासदार निवडायचा, यासाठी आमदारांची मतं घेतली जातात. कोणत्या राज्याचे किती खासदार राज्यसभेवर निवडून जाणार हे संबंधित राज्याच्या लोकसंख्येवरुन निश्चित केलं जातं. त्यामुळे राज्यसभेत सर्वाधिक आमदार उत्तर प्रदेशातील असून त्यानंतर महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि बिहारचा क्रमांक लागतो. राज्यसभा खासदाराचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो.