(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ED : ईडीचे संचालक संजय कुमार मिश्रा यांना पुन्हा मुदतवाढ; 15 सप्टेंबरपर्यंत पदावर राहण्यासाठी न्यायालयाची मान्यता
Sanjay Kumar Mishra : 'राष्ट्रीय हिता'साठी संजय कुमार मिश्रा यांना 15 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढीची देण्यात यावी अशी मागणी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती.
नवी दिल्ली: केंद्र सरकारने मागणी केल्याप्रमाणे आता ईडीचे (ED) संचालक संजय कुमार मिश्रा (Sanjay Kumar Mishra) यांना अखेर मुदतवाढ देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. संजय मिश्रा यांना ईडीचे संचालक म्हणून 15 सप्टेंबरपर्यंत मुदतावाढ देण्यात आली आहे. मिश्रा हे फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्सच्या (Financial Action Task Force FATF) पुनर्रचनेच्या प्रकियेत सहभागी असल्याने राष्ट्रीय हितासाठी त्यांना 15 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी केंद्र सरकारने न्यायालयाकडे केली होती. एसके मिश्रा यांचा ईडी संचालक म्हणून कार्यकाळ 31 जुलै रोजी संपणार आहे.
संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ वाढवू नये असे आदेश सुप्रीम कोर्टाने 2021 मध्येच दिली होते. त्यानंतर देखील नवीन तरतूद करत त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने त्यांच्या मुदतवाढीला आक्षेप घेतला होता.
संजय मिश्रा यांचा ईडीचे संचालक म्हणून 31 जुलैपर्यंत कार्यकाल होता. त्यादरम्यान केंद्र सरकारने नवीन ईडी संचालकांची निवड करावी असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. तसेच त्यांचा कार्यकाळ वाढवणे हे बेकायदेशीर असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले होते. त्यानंतर देखील आठवडा बाकी असताना केंद्राने पुन्हा सुप्रीम कोर्टात संजय मिश्रा यांना मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी केली होती.
2021 मध्ये सुप्रीम कोर्टाने काय म्हटले होते?
संजय कुमार मिश्रा हे ईडीचे संचालक म्हणून 2018 साली नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा कार्यकाळ हा 2020 मध्ये समाप्त होणार होता. मात्र, केंद्र सरकारने त्यांना एक वर्षाची सेवा मुदत वाढ दिली. स्वयंसेवी संस्था 'कॉमन कॉज'ने सुप्रीम कोर्टात या मुदतवाढीला आव्हान दिले होते. 8 सप्टेंबर 2021 मध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटले होते की, मिश्रा यांचा विस्तारीत कार्यकाळ 18 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे आता दखल दिली जाणार नाही. मात्र, त्यांचा कार्यकाळ या पुढे वाढवण्यात येऊ नये असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते.
तिसऱ्यांदा वाढवला कार्यकाळ
संजय मिश्रा यांना 19 नोव्हेंबर 2018 मध्ये दोन वर्षांसाठी ईडीचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नोव्हेंबर 2020 मध्ये मिश्रा पदमुक्त होणार होते. त्याआधीच मे महिन्यात त्यांनी वयाची 60 वर्ष पूर्ण केली. याचा अर्थ त्यांनी निवृत्तीचे वय गाठले. नोव्हेंबर 2020 मध्ये त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधी त्यांचा कार्यकाळ दोनऐवजी तीन वर्षांचा करण्यात आला. त्यानंतर केंद्र सरकारने नोव्हेंबर 2021 मध्ये केंद्रीय दक्षता आयोग (CVC) अधिनियम अंतर्गत एक सुधारणा अध्यादेश जारी केला. त्यानुसार, संजय मिश्रा यांचा कार्यकाळ 18 नोव्हेंबर 2023 रोजी संपणार होता. आता, त्याआधीच सुप्रीम कोर्टाने ही सुधारणा रद्द केली.
कोण आहेत संजय मिश्रा?
संजय मिश्रा हे 1984 च्या बॅचचे भारतीय महसूल सेवा अधिकारी (IRS) आहेत. ऑक्टोबर 2018 मध्ये, संजय मिश्रा यांना ईडीचे संचालक बनवण्यापूर्वी त्यांना तीन महिन्यांसाठी अंतरिम संचालक बनवण्यात आले होते. मिश्रा यांना आर्थिक तज्ञ देखील म्हटले जाते आणि त्यांनी आयकराच्या अनेक महत्त्वाच्या प्रकरणांच्या तपासातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळेच त्यांची ईडी प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. ईडीचे प्रमुख बनण्यापूर्वी मिश्रा यांची दिल्लीतील आयकर विभागात मुख्य आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.