ED Arrested DMK Minister: ईडीनं ताब्यात घेताच धाय मोकलून रडू लागले तामिळनाडूचे मंत्री; रुग्णालयात केलं दाखल
ED Arrested DMK Minister: तामिळनाडूचे मंत्री सेंथिल बालाजी यांना अटक केली आहे. त्यानंतरच त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
ED Arrested DMK Minister: तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे मंगळवारी (13 जून) ईडीनं डीएमके सरकारमधील ऊर्जामंत्री सेंथिल बालाजी यांच्या घरावर छापा टाकला. या छापेमारीनंतर ईडीनं मंगळवारी आणि बुधवारी रात्री उशिरा सेंथिल यांना अटक केली. पण त्यानंतर एक विचित्र घटना घडली. ज्यावेळी ईडीनं कारवाई करत ऊर्जामंत्री सेंथिल बालाजी यांना अटक केली, त्यावेळी मंत्री सेंथिल बालाजी धायमोकलून रडू लागले आणि आपली प्रकृती ठिक नसल्याचं वारंवार ईडी अधिकाऱ्यांना सांगू लागले.
यानंतर लगेचच ईडी अधिकाऱ्यांनी तामिळनाडूचे ऊर्जामंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांना सरकारी रुग्णालयात दाखल केलं. सध्या सोशल मीडियावर सेंथिल बालाजी यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये ते ढसाढसा रडताना दिसत आहेत. दुसरीकडे, घडल्या प्रकाराची माहिती मिळताच द्रमुकचे समर्थक रुग्णालयाबाहेर जमा झाले आणि त्यांनी ईडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली.
ऊर्जामंत्री सेंथिल बालाजी यांना ईडीनं ताब्यात घेतल्यावर काय म्हणाले DMK नेते?
ऊर्जामंत्री सेंथिल बालाजी यांच्य घरावर ईडीनं धाड टाकत छापेमारी केली. त्यानंतर रात्री उशीरा ईडीनं सेंथिल बालाजी यांना ताब्यात घेत अटक केली. पण ईडीनं अटक करताच सेंथिल बालाजी धायमोकलून रडू लागले आणि बरं वाटत नसल्याचं सांगू लागले. ईडी अधिकाऱ्यांनी तात्काळ मंत्री सेंथिल यांना सरकारी रुग्णालयात दाखल केलं.
घडला प्रकार समजताच द्रमुकच्या नेत्यांनी रुग्णालयात जाऊन सेंथिल यांची भेट घेतली. तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन म्हणाले की, आम्ही ही संपूर्ण प्रक्रिया कायदेशीररित्या हाताळू. घाबरू नका. तसेच, डीएमकेचे राज्यसभा खासदार आणि वकील एनआर एलांगो यांनी ईडीनं बेकायदेशीरित्या सेंथिल यांना अटक केल्याचं म्हटलं आहे. ईडीनं त्यांना अटक करताना कायदेशीर प्रक्रियेचं पालन न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तामिळनाडूच्या कायदामंत्र्यांनीही सेंथिल यांच्या अटकेचा तीव्र निषेध व्यक्त केला आणि सांगितलं की, सेंथिल बालाजीला विनाकारण टार्गेट करुन त्रास दिला जात आहे, ईडी गेल्या 24 तासांपासून त्याची सतत चौकशी करत आहे. हे पूर्णपणे मानवी हक्कांच्या विरोधात आहे, त्यांना आणि जनतेला ईडी अन् न्यायालयाला उत्तर द्यावं लागेल, असंही ते म्हणाले.