अद्भुत, अलौकिक, अविस्मरणीय... अयोध्येतील दिपोत्सवाचे फोटो शेअर करत पंतप्रधानांकडून दिवाळीच्या शुभेच्छा!
Diwali in Ayodhya: प्रभू रामाची नगरी अयोध्या दरवर्षी लाखो दिव्यांनी उजळून निघते. यंदाही अयोध्येत दीपोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.
Diwali 2023: दिवाळीनिमित्त (Diwali Celebration) प्रभू रामाची अयोध्या नगरी 22 लाख दिव्यांनी उजळून निघाली होती. पंतप्रधान मोदींनी (PM Modi) अयोध्येत (Ayodhya) आयोजित केलेल्या दीपोत्सवाचं (Deepotsav) वर्णन अद्भुत, अलौकिक आणि अविस्मरणीय असं केलं आहे. दीपोत्सवाचे काही सुंदर फोटोही त्यांनी शेअर केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि प्रभू श्री राम सर्व देशवासियांना आशीर्वाद देवो, अशी माझी इच्छा आहे. माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी ते प्रेरणास्थान बनू दे, असंही मोदींनी शुभेच्छा देताना म्हटलं आहे.
शनिवारी (11 नोव्हेंबर) अयोध्येचं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आलंय. येथे दीपोत्सव 2023 निमित्त 22.23 लाख दिवे प्रज्वलित करण्यात आलेले, लक्ष लक्ष दिव्यांनी संपूर्ण अयोध्यानगरी उजळून निघालेली. महत्त्वाचं म्हणजे, अयोध्येनं स्वतःचाच पूर्वीचा 15.76 लाख दिव्यांच विक्रम मोडला. 2017 मध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं सरकार आल्यावर अयोध्येत दिव्यांचा उत्सव सुरू झाला. त्या वर्षी 51 हजार दिवे लावण्यात आले होते, तर त्याच्याच पुढच्या वर्षी म्हणजे, 2019 मध्ये 4.10 लाख दिवे लावण्यात आलेले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?
अयोध्येतील दीपोत्सवाचे फोटो शेअर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिलंय की, "अद्भूत, अलौकिक आणि अविस्मरणीय. लाखो दिव्यांनी उजळून निघालेल्या अयोध्या नगरीच्या दीपोत्सवानं संपूर्ण देश उजळून निघत आहे. यातून निर्माण होणारी ऊर्जा संपूर्ण भारतात नवी उमेद आणि नवा उत्साह पसरवत आहे. प्रभू श्री राम सर्व देशवासियांचे कल्याण करतील आणि माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी प्रेरणास्थान बनतील, अशी माझी इच्छा आहे. जय सिया राम!"
दरम्यान, यंदाच्या दिवाळीला काही विशेष महत्त्व आहे. याचं कारण पुढील वर्षी 22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिराचा अभिषेक होणार आहे. अशा प्रकारे राम मंदिर तयार होईल. सध्या राम मंदिराच्या उभारणीचं काम वेगानं सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिराच्या अभिषेक सोहळ्यात सहभागी होणार आहेत.
दिवाळीनिमित्त अयोध्यानगरीही नववधूप्रमाणे सजली होती. दिपोत्सवानिमित्त अयोध्येत आकर्षक रोषणाई करण्यात आलीए. दरवर्षी अयोध्येत लक्ष दिव्यांची आरास केली जाते. यंदा अयोध्येच्या दिवपोत्सवानं स्वतःचाच रेकॉर्ड मोडीत काढला आहे. यंदा दीपोत्सव 2023 निमित्त 22.23 लाख दिवे प्रज्वलित करण्यात आलेले, लक्ष लक्ष दिव्यांनी संपूर्ण अयोध्यानगरी उजळून निघालेली.