Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या लोकांनी गुगलवर सगळ्यात जास्त काय सर्च केलं?
Pahalgam Terror Attack: हल्ल्याचा परिणाम पाकिस्तानच्या सोशल मीडियावरही दिसून येत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर #PahalgamTerroristAttack हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे. यासोबतच #Modi हा हॅशटॅग देखील वापरला जात आहे.

Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारतातील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोकांचा रोष उफाळून आला आहे. बहुतेक लोक पाकिस्तान आणि तेथील दहशतवादी संघटनांबद्दल संताप व्यक्त करत आहेत. अनेकांनी सोशल मिडियावरती रोष व सरकारकडे मागणी केली आहे की, यावेळी पाकिस्तानला असं उत्तर द्यावं की, भविष्यात ते पुन्हा असं काही पाऊल उचलण्याचे धाडसही करू शकणार नाही. या हल्ल्याबाबत पाकिस्तानकडूनही अधिकृत प्रतिक्रिया आल्या आहेत. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी एक निवेदन देताना म्हटले आहे की, पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी पाकिस्तानचा कोणताही संबंध नाही, पाकिस्तान सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध करतो. दरम्यान, भारतातील पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत म्हटलं की, मला विश्वास आहे पाकिस्तान भारताच्या कोणत्याही हल्ल्याला हाणून पाडण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.
पाकिस्तानमध्ये 'पहलगाम दहशतवादी हल्ल्या'बद्दल चर्चा
सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहलगाममधील हा हल्ला चार दहशतवाद्यांनी केला होता, त्यापैकी दोन पाकिस्तानी नागरिक असल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्याचा परिणाम पाकिस्तानच्या सोशल मीडियावरही दिसून येत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर #PahalgamTerroristAttack हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे. यासोबतच #Modi हा हॅशटॅग देखील वापरला जात आहे, ज्यामध्ये अनेक लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानवर मोठा हल्ला करू शकतात असा उल्लेख करत आहेत.
सध्या, पाकिस्तानमधील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर अनेक हॅशटॅग आणि कीवर्ड ट्रेंड करत आहेत. यासोबतच, भारत आणि पाकिस्तानमधील अलिकडच्या तणावपूर्ण परिस्थितीच्या संदर्भात काश्मीर, मोदी, पुलवामा आणि जम्मू सारखे कीवर्ड ट्रेंडिंगमध्ये आहेत. पोप फ्रान्सिस यांचे नावही चर्चेत आहे. याशिवाय, बॉलिवूड आणि आर्मीसारखे शब्द नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर आपले स्थान टिकवून आहेत. एवढेच नाही तर पाकिस्तानमध्ये लोक गुगलवर या हल्ल्याशी संबंधित 'पहलगाम' आणि 'पहलगाम हल्ला' असे कीवर्ड देखील शोधत आहेत. या हल्ल्याबाबत शेजारील देशात अस्वस्थता आणि अशांतता आहे हे स्पष्ट आहे.
पाकिस्तानला बदला घेण्याची धास्ती
काल (मंगळवारी) जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यात आतापर्यंत 26 निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. या हल्ल्याबाबत देशभरात संतापाचे वातावरण आहे आणि केंद्र सरकारपासून ते सुरक्षा दलांपर्यंत प्रत्येक स्तरावर कठोर कारवाईची चर्चा आहे.
दरम्यान, पाकिस्तानकडूनही काही हालचाली दिसून येत आहेत. पाकिस्तानी लष्कराने नियंत्रण रेषेवर (एलओसी) हाय अलर्ट जारी केला आहे. काही वृत्तसंस्थांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकव्याप्त काश्मीर (POK) मध्ये 42 दहशतवादी लाँच पॅड सक्रिय आहेत, ज्यावर 110 ते 130 दहशतवादी उपस्थित आहेत. याशिवाय, काश्मीर खोऱ्यात 70 ते 75 दहशतवादी सक्रिय असल्याचे सांगितले जात आहे आणि जम्मूच्या राजौरी भागात 60 ते 65 दहशतवादी सक्रिय असल्याचे सांगितले जात आहे. वृत्तानुसार, हे सर्व दहशतवादी पाकिस्तानी नागरिक आहेत.
























