(Source: ECI/ABP News/ABP Majha)
DHFL : सीबीआयची मोठी कारवाई, अजय नवंदरला अटक; तो अंडरवर्ल्डचा हस्तक असल्याचा सीबीआयचा दावा
अजय नवंदरने आपल्या हवाला नेटवर्कचा वापर करुन वाधवान बंधुंचा पैसा अंडरवर्ल्डपर्यंत पोहोचवला असल्याचा संशय सीबीआयला आहे.
मुंबई: डीएचएफएल केस (DHFL case) प्रकरणी सीबीआयने मोठी कारवाई केली असून अजय नवंदरला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. अजय नवंदर हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा हस्तक असल्याचा दावा सीबीआयने केला आहे. डीएचएफएल घोटाळ्याचे पैसे अजय नवंदरने दाऊद, छोटा शकील यांना दिल्याचा संशय सीबीआयने व्यक्त केला आहे. डीएचएफएल केस प्रकरणातील ही मोठी कारवाई असून या प्रकरणी सीबीआयला नवी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
डीएचएफएलने 17 बँकांकडून पैसा उचलून मोठा घोटाळा केला होता, हा पैसा अजय नवंदरने हवालाच्या माध्यमातून भारताबाहेर पाठवल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. हा पैसा दाऊद आणि छोटा शकील यांच्यापर्यंत पोहचून या पैशाचा वापर भारतविरोधी कारवाईमध्ये वापरल्याचा संशयही सीबीआयला आहे. अजय नवंदर याच्या अटकेनंतर या प्रकरणात अंडरवर्ल्ड आणि राजकीय कनेक्शन काय आहे याचा तपास सीबीआय करत आहे.
अजय नवंदरला मुंबईतून अटक करण्यात आली असून त्याला दिल्लीतील सीबीआयच्या कार्यालयात नेण्यात आलं आहे. नवंदरने आपल्या हवाला नेटवर्कचा वापर करुन वधवान बंधुंचा हा पैसा अंडरवर्ल्डपर्यंत पोहोचवला आहे.
अजय नवंदर हा सामाजिक कार्यकर्ता असून त्याचे राजकारणी लोकांसोबत कनेक्शन आहे. त्यामुळे या प्रकरणात काही राजकीय लागेबंधे आहेत का याचाही तपास सीबीआय करत आहे.
काय आहे प्रकरण?
डीएचएफएलचे कपिल वधवान आणि धिरज वधवान यांच्या विरोधात सीबीआयने सरकारचे अनुदान लाटल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. या लोकांनी मुंबईतील बांद्रा येथे एक डीएचएफएलची एक खोटी शाखा उघडली आणि त्यामाध्यमातून 14,046 कोटी रुपयांची पंतप्रधान आवास योजनेचे खोटी कर्ज खाती तयार केली. ज्यांच्या नावावे खाती काढण्यात आली होती त्या ग्राहकांनी आपले कर्ज आधीच भरले होते. या खात्यांना डेटाबेसमध्ये टाकण्यात आलं.
कपिल वधवान आणि धिरज वधवान हे दोघे येस बँक घोटाळ्याच्या संबंधित मनी लॉन्ड्रिगच्या आरोपाखाली आधीपासूनच तुरुंगात आहेत. आता पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून 1,887 कोटी रुपयांचे अनुदान लाटण्यासाठी त्यांनी खोटी खाती तयार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
सीबीआयने सांगितल्या प्रमाणे, डिसेंबर 2018 पर्यंत डीएचएफएलने पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून 539.40 कोटी रुपयांचे अनुदान असलेली 88,651 खोटी कर्ज प्रकरणं करण्यात आली. 2007 ते 2019 या दरम्यान खोट्या कर्ज खात्यांच्या माध्यमातून 14,046 कोटी रुपयांची 2.60 लाख खोटी गृह कर्ज खाती तयार करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे ही खाती मुंबईतील बांद्रा येथील अशा शाखेत काढण्यात आली जी बँक कधीच अस्तित्वातच नव्हती.