नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी या मुद्द्यावरुन दिल्लीत हिंसाचार उसळला आहे. आतापर्यंत 34 जणांचा मृत्यू झाला असून 100 पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांना खडेबोल सुनावणाऱ्या न्यायाधीशांची अचानक तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.


राजधानी दिल्लीत उसळलेल्या हिंसाचाराने आतापर्यंत 34 बळी घेतले आहेत. पोलिसांनी अटकसत्र सुरू केलं असून आतापर्यंत 106 जणांना अटक केली आहे. या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. भाजप नेत्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे ही हिंसा झाल्याचं या याचिकेत म्हटलं आहे. या याचिकेवर सुनावणी करणाऱ्या न्यायाधिशांची रातोरात बदली करण्यात आली आहे.


राष्ट्रपती भवनमधून न्यायाधीश एस. मुरलीधर यांच्या बदलीची अधिसूचना जारी करण्यात आली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्याशी चर्चा केल्यानंतर न्यायाधीश एस, मुरलीधर यांची बदली पंजाब हरियाणा हायकोर्टात केली. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सुप्रीम कोर्टाच्या समितीने १२ फेब्रुवारीला दिल्ली हायकोर्टातील न्यायाधीश एस मुरलीधर यांची बदली पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात करण्याची शिफारस केली होती.





दिल्ली हिंसाचारप्रकरणी बुधवारी उच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणी पार पडली. न्यायाधीश एस. मुरलीधर हे या प्रकरणावर न्यायाधीश म्हणून सुनावणी करत होते. त्यावेळी दिल्ली पोलिसांवर ताशेरे ओढणाऱ्या दिल्ली हायकोर्टचे न्यायमूर्ती एस. मुरलीधर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांची पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात बदली करण्यात आली आहे. काल न्यायमूर्ती मुर्लीधर यांनीच कपिल मिश्रा, अनुराग ठाकूर आणि प्रवेश वर्मा यांच्यावर तातडीने एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते.


पाहा व्हिडीओ : दिल्ली होरपळली... कुणाला तीची वेदना कळली?



न्यायमूर्ती मुरलीधर यांची बदली झाल्यामुळे केंद्र सरकारवर टीका करण्यात येत आहे. भाजप नेत्यांविरोधात एफआयआर दाखल करा म्हणणाऱ्या न्यायमूर्तींची एका दिवसात बदली करुन केंद्र सरकार काय साध्य करु इच्छित आहे? असे प्रश्नही विचारले जाऊ लागले आहेत. तसेच आज होणाऱ्या सुनावणीमध्ये दिल्ली पोलीस आपली बाजू मांडणार आहेत. मात्र आजची सुनावणी होण्याआधीच मुरलीधर यांची रातोरात पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अचानक न्यायमूर्ती मुरलीधर यांच्या झालेल्या बदलीमुळे चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे दिल्ली उच्च न्यायालयातील आजच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


दिल्लीत दंगल भडकवल्याप्रकरणी 18 FIR दाखल करण्यात आले आहेत. या हिंसाचारात 56 पोलिसांसह 200 जण जखमी असल्याचं सांगितलं जात आहे. जखमींवर दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनेक ठिकाणी 144 कलम लागू करण्यात आलं आहे. दरम्यान, अनुराग ठाकूर, प्रवेश वर्मा यांनी दिल्ली विधानसभेच्या प्रचार काळात 'देश के गद्दारोको, गोली मारो सालो को' अशा घोषणा दिल्या होत्या. तर कपिल मिश्रा यांनी दिल्लीत दुसरे शाहीन बाग होऊ देणार नाही असं म्हटलं होतं. तसेच पोलिसांना शक्य नसेल तर आम्ही कायदा हातात घेऊ, असं चिथावणी खोर वक्तव्य केलं होतं.


संबंधित बातम्या : 


शहीद कॉन्स्टेबलच्या कुटुंबीयांना एक कोटीची तर हिंसाचारातील मृतांना दोन लाखांची मदत : अरविंद केजरीवाल


Delhi Riots | हिंसाचारग्रस्त भागात शूट अॅट साईटचे आदेश, डोवाल यांच्याकडून परिस्थितीचा आढावा


Majha Vishesh | दिल्ली पेटवण्याचं पाप कुणाचं?