नवी दिल्ली : केंद्रात आणि राज्याच्या निवडणुकीत दिल्लीकरांनी सजग कौल दिला आणि शहराची शहाणीव जागृत असल्याचं दाखवून दिलं. जेएनयुमध्ये सुरूवातीला पाहिलेला असंतोष असो की अगदी आता आतापर्यंत जामिया-जेएनयुतील हल्ले असो, या शहरानं अशा जखमांना चिघळू दिलं नाही. नाही म्हणायला नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या काळात "गोली मारो" वगैरे भडक वक्तव्यं झाली, पण दिल्लीकरांनी समंजसपणा दाखवला आणि म्हणूनच सीएएविरोधी शाहीनबागचं आंदोलन 70 दिवस एकाच ठिकाणाहून शांतपणे चालू राहू शकलं. मात्र, गेल्या दोन दिवसात दिल्ली धुमसू लागली आहे. जणू काही त्यापूर्वीची शांतता ही सामंजस्याची नव्हती तर वादळापूर्वीची होती!


त्यातच सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताच्या दौऱ्यावर आणि अगदी दिल्लीत असल्यानं दिल्लीतल्या हिंसाचाराच्या बातम्या जागतिक मीडियात न झळकत्या तरंच नवल! खरं तर केवळ परदेशी पाहुणा आपल्या शहरात आलाय म्हणूनच नव्हे तर राजधानीचं शहर म्हणूनही दिल्लीत कायदा-सुव्यवस्था चोखच असायला हवी, मात्र जणू कुणीतरी हे वातावरण चिघळू देतंय अशी स्थिती आहे. सोमवारी दिल्लीत अचानक हिंसाचार सुरू झाला आणि सीएए समर्थक व विरोधक एकमेकांना भिडले. त्याच सुमारास भाजप नेते कपिल मिश्रा यांनी शाहीन बाग आटोपण्यात आली नाही तर आम्ही उत्तर देऊ अशा आशयाचं वक्तव्यं केलं.अशानं तापलेलं वातावरण अधिकंच गरम झालं. गेल्या दोन दिवसात दिल्लीत 10 जणांचा मृत्यू झालाय. यात एक पोलीस कर्मचारीसुद्धा आहे. हे सगळं घडवण्याचं-पेटवण्याचं काम कुणाचं? यावरच झाली 'माझा विशेष'ची चर्चा.


'माझा'चे दिल्ली प्रतिनिधी प्रशांत कदम आणि ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखडे यांनी याबाबत पोलीस व पर्यायानं केंद्रीय गृहखात्यावर टीका केली. भाजप नेत्यांच्या भडकाऊ भाषणाला आवर न घालण्यात आल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. काँग्रेसच्या सचिन सावंत यांनी परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकारला अपयश आल्याचा आरोप करत परिस्थिती चिघळू दिल्याचा आरोप केला. 'आप'चे प्रवक्ते धनंजय शिंदे म्हणाले की, दिल्लीत वातावरण बिघडवण्याचं षडयंत्र अनेक दिवस चालू आहे. पोलिसांना कल्पना असूनही त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काहीही केलं नाही. दुसरीकडे, भाजपचे आमदार राम कदम यांनी काँग्रेसवर हिंसक आंदोलकांना पाठिंबा दिल्याचा आरोप केला. यावर चिडलेल्या काँग्रेस प्रवक्त्यांनी भाजप नेत्यांना प्रसंगाचं गांभीर्य नसल्याची टीका केली. राजकीय विश्लेषक भाऊसाहेब आजबे यांनी दिल्लीचा हा प्रकार धार्मिक ध्रुवीकरणाचा असल्याचं निरीक्षण मांडत, हा पॅटर्न उत्तर प्रदेश आणि प. बंगाल निवडणुकांपर्यंत वापरला जाण्याचा अंदाज व्यक्त केला. तर, अभाविपचे कार्यकर्ते अनिकेत ओव्हाळ यांनी शाहीनबाग, मुंबईतल्या गेट वेवर फ्री काश्मिरचं पोस्टर, एमआयएमच्या वारीस पठाण यांनी 15 कोटी वि. 100 कोटी केलेलं वक्तव्य, ओवेसींच्या सभेत पाकिस्तान झिंदाबादचे नारे याची दिल्लीत प्रतिक्रिया उमटल्याचं मत व्यक्त केलं.


अर्थव्यवस्था मंदावली असताना, शिक्षण-रोजगार-आरोग्य यांच्या समस्या पुढ्यात असताना, देश अशा भावनिक आणि हिंसक घटनांमध्ये कोण ढकलतं? याचा मात्र विचार सर्वांनीच करायला हवा.


Majha Vishesh | दिल्ली कुणी पेटवली? दिल्ली पोलीस इतके हतबल कसे? | ABP Majha



संबंधित बातम्या : 


Delhi Violence | हिंसाचारात दहा जणांचा मृत्यू, 186 जखमी


दिल्लीतल्या हिंसाचाराची केंद्राकडून गंभीर दखल, अमित शाह आणि केजरीवाल यांच्यात बैठक