मुंबई : आता कोणत्याही एटीएममध्ये दोन हजार रुपयांचा नोटा मिळणार नाहीत. इंडियन बँकपाठोपाठ सर्वच बँकांच्या एटीएममधून आता दोन हजार रुपये मूल्याच्या नोटा बंद होणार आहेत. त्याऐवजी 100 रुपये, 200 रुपये 500 रुपये मूल्याच्या नोटा एटीएममध्ये मिळतील. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. एटीएममध्ये नोटा मिळणार नसल्या तरी त्या पूर्वीप्रमाणेच वैध असतील.


देशभरातील 2 लाख 40 हजार एटीएममधून दोन हजार रुपयांच्या नोटांचे ट्रे काढण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे आता प्रत्येक मशीनमध्ये 500, 200 आणि 100 रुपयांच्या नोटांचे ट्रे उपलब्ध होईल. एटीएममध्ये असलेल्या चारपैकी तीन ट्रेमध्ये 500 रुपयांच्या नोटा ठेवल्या जातील. तर उर्वरित एका ट्रेमध्ये 100 किंवा 200 रुपयांच्या नोटा मिळतील. या प्रक्रियेसाठी किमान एक महिना लागेल, असा अंदाज आहे.

इंडियन बँकेने आपल्या सर्व तीन हजार एटीएमध्ये दोन हजारांच्या नोटा न ठेवण्याचा आदेश जारी केला होता. एटीएममधून दोन हजारांच्या नोटा आल्यानंतर, कमी मूल्याच्या नोटांसाठी लोक बँकेच्या शाखांमध्ये येतात, परिणामी तिथे मोठी गर्दी होते. त्यामुळे एटीएममधून दोन हजारांच्या नोटा काढल्यामुळे सर्वसामान्यांना फारसा त्रास होणार आहे.

8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी घोषित केली. या निर्णयामुळे जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बंद झाल्या. त्यानंतर सरकारने 500 च्या नव्या नोटा बाजारात आणल्या. तर 1000 रुपयांची नोट बंद करुन त्याऐवजी 2000 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या. लोकांना रोख रकमेची टंचाई भासू नये, म्हणून दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्यात आल्या.

दोन हजार रुपयांचे सुट्टे किंवा मोड मिळण्यास अडचणी येत असल्याच्या तक्रारी तेव्हापासून सुरुच होत्या. आता दैनंदिन व्यवहारातून सरकार या नोटा हळू हळू हटवण्याच्या तयारीत असल्याचं कळतं.
दरम्यान, एटीएममधून दोन हजारची नोट गेल्यामुळे सर्वसामान्यांवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही.