Delhi Kanjhawala Accident: 'त्या' तरुणीवर बलात्कार नाही, पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर, पोलिसांना FSL रिपोर्टची प्रतिक्षा
Delhi Girl Dragged Case: दिल्लीतील कंझावाला येथील अपघात आणि तरुणीच्या मृत्यू प्रकरणात (Delhi Kanjhawala Accident) नवीन माहिती समोर आली आहे.
Delhi Girl Dragged Case: दिल्लीतील कंझावाला येथील अपघात आणि तरुणीच्या मृत्यू प्रकरणात (Delhi Kanjhawala Accident) नवीन माहिती समोर आली आहे. तरुणीचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोस्टमार्टम रिपोर्टमधून तरुणीवर बलात्कार झाला नसल्याचं समोर आले आहे. त्याशिवाय तरुणीच्या प्रायव्हेट पार्टवर कोणत्याही जखमा मिळालेल्या नाहीत. पण हा रिपोर्ट अद्याप पोलिसांपर्यंत पोहचलेला नाही. अद्याप एफएसएल (FSL) रिपोर्टची प्रतिक्षा केली जात आहे.
नवीन वर्षाची पार्टी करुन कुतुबगढच्या दिशेने वेगाने जाणाऱ्या चारचाकी गाडीने स्कूटीवरुन जाणाऱ्या एका तरुणीला कंझावाला येथे धडक दिली होती. तसेच, नशेत असलेल्या या तरुणांनी तिला अक्षरश: सहा ते सात किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं होतं. या प्रकरणानंतर दिल्लीसह देशभरात संतापाची लाट उसळली. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं होतं. मौलाना आजाद मेडिकल कॉलेजच्या मोर्चरी विभागात तरुणीचं पोस्टमार्टम करण्यात आलं. तरुणीच्या कुटुंबियांनी अपघातापूर्वी बलात्कार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगानं (National Commission for Women) दिल्ली पोलिसांना पत्र लिहून तरुणीवर बलात्कार झाला होता की नाही, याची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये सत्य समोर येणार -
सध्या समोर आलेला पोस्टमार्टम रिपोर्ट सुरुवातीचा आहे. अद्याप एफएसएल रिपोर्टची प्रतिक्षा केली जात आहे. संपूर्ण पोस्टमार्ट रिपोर्ट लवकरच दिल्ली पोलिसांना दिली जाणार आहे. त्यानंतरच अपघाताआधी तुरुणीवर बलात्कार झाला होता का? समोर येईल. आज तरुणीवर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. दिल्ली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच पोलिसांच्या तपासकार्याला वेग येणार आहे.
दरम्यान, पोस्टमार्टम रिपोर्ट येण्याआधीच दिल्ली पोलीस आयुक्त संजय आरोरा गृह मंत्रालयात गेले आहेत. तिथं ते केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांच्याशी चर्चा करणार आहेत. दिल्लीतील कंझावाला अपघात आणि मृत्यू प्रकरणाची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गंभीर दखल घेतलीय. तातडीने अहवाल सादर करण्याचे पोलिसांना आदेश देण्यात आले आहेत. याप्रकरणी आयुक्त संजय आरोरा गृह मंत्रालयात पोहचले आहेत.
पाच जणांना पोलिसांनी ठोकल्यात बेड्या -
दिल्लीतील कंझावाला घटनेत पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. दीपक खन्ना (26), अमित खन्ना (25), कृष्णन (27) , मिथुन (26) आणि मनोज मित्तल (27) अशी अटक केलेल्या पाचही आरोपींची नावे आहेत.