(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Delhi-Ayodhya Flight: आता विमानातून होणार अयोध्येपर्यंतचा प्रवास, कधीपासून होणार सेवा सुरु, जाणून घ्या सविस्तर
Delhi-Ayodhya Flight: राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी दिल्ली ते अयोध्येमध्ये विमानसेवा सुरु होणार आहे. एअर इंडियाने ही घोषणा केली आहे.
नवी दिल्ली : 22 जानेवारीला राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) अभिषेक सोहळ्यापूर्वी अयोध्येतील श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळाची सेवा सुरू होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर एअर इंडियाने (Air India) दिल्ली आणि अयोध्येदरम्यान 30 डिसेंबरपासून विमानसेवा सुरु होणार असल्याची घोषणा होणार आहे. दरम्यान 16 जानेवारी 2024 पासून ही दैनंदिन सेवा सुरु होणार आहे.
पीटीआएय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडिया एक्सप्रेसने सांगितले की, 30 डिसेंबर रोजी उद्घाटन फ्लाइट IX 2789 दिल्लीहून सकाळी 11 वाजता निघेल आणि दुपारी 12.20 वाजता अयोध्येत उतरेल. त्यानंतर, अयोध्येहून परतीच्या फ्लाइट क्रमांक IX 1769 दुपारी 12.50 वाजता दिल्लीसाठी रवाना होईल आणि 2.10 वाजता येथे पोहोचेल. या प्रवासादरम्यान प्रवासी अवघ्या 80 मिनिटांत त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचतील.
एअर इंडिया एक्सप्रेस दररोज 300 पेक्षा जास्त उड्डाणे चालवतात
एअर इंडिया दररोज 300 हून अधिक उड्डाणे चालवतात. 14 डिसेंबर रोजी, विमान वाहतूक नियामक DGCA ने आगामी अयोध्या विमानतळासाठी एरोड्रोम परवाना जारी केला होता, जो भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) सुमारे 350 कोटी रुपये खर्चून विकसित केला आहे.
इंडिगो 30 डिसेंबरपासून अयोध्येसाठी सेवा सुरु करणार
इंडिगोने 13 डिसेंबर रोजी सांगितले होते की ते 30 डिसेंबर रोजी राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली ते अयोध्या विमानतळापर्यंतचे उद्घाटन उड्डाण चालवेल. त्याचबरोबर 6 जानेवारीपासून व्यावसायिक सेवा सुरू होणार आहेत.
या महिन्याच्या अखेरीस विमानतळ तयार होईल- ज्योतिरादित्य सिंधिया
नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी 8 डिसेंबर रोजी सांगितले होते की, अयोध्येतील विमानतळ या महिन्याच्या अखेरीस तयार होईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्या विमानतळाचे उद्घाटन करतील.
अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाचा पहिला टप्पा २०२० मध्ये कोविड लॉकडाऊन दरम्यान सुरू झाला जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिराची पायाभरणी केली.