Cyclone Mocha: भीषण वादळात रुपांतरीत झालं 'मोखा' चक्रीवादळ; बंगालच्या किनारी भागात सतर्कतेचा इशारा
Cyclone Mocha: 14 मे रोजी, चक्रीवादळ मोखानं म्यानमारच्या किनारपट्टीवरील सिटवे येथे कहर केला. याशिवाय बंगालमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. लोकांनी समुद्राजवळ जाऊ नये यासाठी विभागानं नियमावली जारी केली आहे.
Cyclone Mocha: मध्य बंगालच्या उपसागराला (Bay of Bengal) लागून असलेल्या अग्नेय भागांत 'मोखा' चक्रीवादळाचे (Cyclone Mocha) तीव्र वादळात रूपांतर झालं आहे. तसेच, मोका वादळ 9 किमी ताशी वेगानं उत्तरेकडे सरकत आहे. रविवारी 14 मे रोजी मोका चक्रीवादळ बांगलादेश आणि म्यानमारच्या समुद्रकिनाऱ्यांवर धडकलं. दरम्यान, या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील आपत्ती व्यवस्थापन दलाच्या जवानांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पूर्वा मेदिनीपूर आणि दक्षिण 24 परगणा जिल्ह्यांचा किनारी भाग हाय अलर्टवर आहे. पीटीआयच्या अहवालात असं म्हटलं आहे की, लाईव्ह गार्ड्स एनडीआरएफची पथकांसह दिघा-मंदारमणी किनारी भाग देखील सतर्क आहे. तसेच लोकांनी समुद्राजवळ किंवा समुद्रकिनारी जाऊ नये यासाठी हवामान विभागानं नियमावली जारी केली आहे.
ESCS Mocha weakened into a VSCS and centred at 1730 hours IST of today near 21.1 N and 93.3 E about 120 km north-northeast of Sittwe (Myanmar) and 140 km east-southeast of Cox s Bazar (Bangladesh). The system is continuing the weakening trend and will become a CS in next 6 hrs. pic.twitter.com/B521YzH4Is
— India Meteorological Department (@Indiametdept) May 14, 2023
आपत्तीचा सामना करण्यासाठी जवान तैनात
आपत्ती व्यवस्थापन विभागानं लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन गटाचे 100 हून अधिक कर्मचारी बाक्खाली बीचवर तैनात केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सुंदरबनच्या तटबंदीला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. तसेच, तटबंदीच्या आजूबाजूचे मार्ग बंद करण्यात आले आहेत.
पर्यटकांना समुद्राजवळ जाण्यास मनाई
लोकांनी समुद्राजवळ जाऊ नये यासाठी पोलीस आणि प्रशासन वारंवार लोकांना आवाहन करत आहे. गावागांवात लाऊडस्पीकरचा वापर करुन सातत्यानं प्रशासनाकडून लोकांना माहिती पुरवली जात आहे. एनडीआरएफ टीमचे सदस्य विकास साधू म्हणाले की, आम्ही पर्यटकांना समुद्राजवळ जाऊ देत नाही, सध्या समुद्र खवळलेला असून जोरदार लाटा उसळत आहेत. आम्ही समुद्रकिनाऱ्यावरील हालचालींवर नियंत्रण ठेवत आहोत. आम्हाला पुढील काही तास सतर्क राहण्यास सांगण्यात आलं आहे.
हे वादळ सोमवारी (15 मे) राज्यात धडकण्याची शक्यता आहे, त्यामुळे पूर्वा मेदिनीपूर आणि दक्षिण 24 परगणा जिल्ह्यांतील किनारी भागांतील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोचा चक्रीवादळ कॉक्स बाजारपासून 250 किमी दक्षिणेकडे होतं.
सिटवेमध्ये मोका चक्रीवादळाचा कहर
डेली स्टारच्या वृत्तानुसार, रविवारी (14 मे) चक्रीवादळ मोकानं म्यानमारच्या किनारी भागांत असलेल्या सिटवेमध्ये कहर केला आहे. म्यानमारच्या सिटवेचा काही भाग जलमय झाला होता, तर ताशी 130 किमी वेगानं वारे वाहत होते. अल जझिरानं दिलेल्या माहितीनुसार, म्यानमारमधील भूस्खलनामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच म्यानमारमध्ये झाड पडल्यानं एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची बातमी स्थानिक माध्यमांनी दिली आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, NDRF च्या दुसऱ्या बटालियनचे कमांडंट गुरमिंदर सिंह यांनी सांगितलं की, मोखा चक्रीवादळाचं 12 मे रोजी तीव्र चक्रीवादळात आणि 14 मे रोजी अत्यंत तीव्र चक्रीवादळात रुपांतर होईल. त्याचवेळी भुवनेश्वरमधील आयएमडीचे वरिष्ठ अधिकारी संजीव द्विवेदी यांनी अंदाज वर्तवला आहे की, 12 मे रोजी संध्याकाळी मध्य बंगालच्या उपसागरावर त्याचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर होईल. त्यावर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.