(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CWC Meeting | कोरोना लसीकरणाची वयोमर्यादा 25 वर्ष करावी, सोनिया गांधी यांची मागणी
सरकारने लसीकरणाच्या वयोमर्यादेवर फेरविचार केला पाहिजे आणि वयोमर्यादा 25 वर्षांपर्यंत कमी करावी, अशी मागणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली.
नवी दिल्ली : कॉंग्रेसचे अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कोरोना महामारीची सद्यस्थितीवरुन केंद्र सरकारची निशाणा साधा आहे. तसेच कोरोना लसीकरणासाठीची वयोमर्यादा 25 वर्ष करावी अशी मागणी देखील केली आहे. अस्थमा, मधुमेह आणि इतर आजारांनी ग्रस्त तरुणांना लसीकरणासाठी प्राधान्य द्यावे अशी मागणीही केली आहे.
सोनिया गांधी आज काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होत्या. सरकारने कोरोनाचा सामन करताना आरोग्य उपकरणे आणि औषधांवरील जीएसटी आकारणे बंद केले पाहिजे. कोरोना संकटात कडक निर्बंध लागल्यास गरीबांना प्रतिमहिना सहा हजार रुपयांची मदत सरकारने मदत करणे आवश्यक आहे, असं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.
कोरोना व्हायरसमुळे हजारो लोकांचे मृत्यू होत आहेत, यावर सोनिया गांधी यांनी दु:ख व्यक्त केलं. संकट काळात आपलं कर्तव्य बजावणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना काँग्रेस पक्ष सलाम करतो, असं सोनिया गांधी यांनी म्हटलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्राचा उल्लेख करत म्हटलं की, अनेक ठिकाणी लसी, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्सची कमतरता भासत आहे. मात्र तरीही केंद्र सरकार गप्प आहे, असं सोनिया गांधी यांनी म्हटलं.
सरकारने लसीकरणाच्या वयोमर्यादेवर फेरविचार केला पाहिजे आणि वयोमर्यादा 25 वर्षांपर्यंत कमी करावी. दमा, मधुमेह, मूत्रपिंड आणि यकृत आजारांनी ग्रस्त असलेल्या सर्व तरूणांना लस द्यावी, अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली. देशात सध्या कोरोना लसीकरणासाठी किमान वयोमर्यादा 45 वर्षे आहे.