Crude Price Rise : गेल्या सहा दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यामुळे रशियावर अनेक देशांनी आर्थिक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे कच्च्या तेलाच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. कच्च्या तेलाची किंमत 110 डॉलर प्रति बॅलरवर पोहोचली आहे. रशियावर घालण्यात आलेल्या निर्बंधामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा करण्यासाठी अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. परंतु, ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी यूएस प्रशासनाने इतर 30 देशांसह यूएस स्ट्रॅटेजिक रिझर्व्हमधून लाखो बॅरल तेल देण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांनी याबाबतची घोषणा केली आहे.
"अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांचा रशियाच्या अर्थव्यवस्थेवर व्यापक परिणाम व्हावा यासाठी त्यांचे प्रशासन कठोर पावले उचलत आहे. याबरोबरच अमेरिकन व्यवसाय आणि ग्राहकांच्या संरक्षणासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे आश्वासन जो बायडेन यांनी दिले आहे.
"मी अमेरिकेच्या नागरिकांसोबत कायम प्रामाणिक राहीन. रशियन हुकूमशहाने दुसर्या देशावर हल्ला केला आहे. त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. परंतु, अमेरिकेने इतर 30 देशांसह जगभरातील तेल साठ्यांतून तीन कोटी बॅरल तेल देण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिका या उपक्रमाचे नेतृत्व करेल. आम्ही आमच्या धोरणात्मक पेट्रोलियम साठ्यातून तीन कोटी बॅरल तेल सोडत आहोत. गरज भासल्यास आणखी कच्चे तेल उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहिती जो बायडन यांनी दिली आहे.
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थाबंले नाही तर कच्च्या तेलाचे भाव आणखी वाढू शकतात. त्यामुळे भारतासह कच्च्या तेलाची आयात करणाऱ्या देशांना त्याचा मोठा फटका बसू शकतो. जगभरातील तेल उत्पादक देशांपैकी रशिया हा तेलाचे उत्पादन करणारा देश आहे. रशिया युरोपला 35 टक्के कच्च्या तेलाचा पुरवठा करतो. भारत रशियाकडून कच्चे तेलही खरेदी करत आहे. त्यामुळे दोन्ही देशांतील युद्ध थांबले नाही तर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. हा अडथळा निर्माण झाला तर कच्च्या तेलाच्या किमती आणखी वाढू शकतात.
महत्वाच्या बातम्या
- Russia Ukraine Conflict : युद्धाच्या सातव्या दिवशी युक्रेनमधील खारकिव्ह रशियाच्या निशाण्यावर, महत्त्वाच्या इमारतींवर क्षेपणास्त्र हल्ले
- Russia-Ukraine War : रशिया आणि युक्रेन प्रकरणावर 7 आणि 8 मार्चला आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी होणार
- Russia-Ukraine War : किव्ह संकटात, उपग्रहानं टिपला 'पुरावा'; रशियाची अजस्त्र फौज मोठा हल्ला करण्याच्या तयारीत
- Joe Biden on Russia Ukraine: युक्रेनच्या जमिनीवर अमेरिकन सैन्य? बायडन यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे